

सांगली; विवेक दाभोळे : प्रामुख्याने दुष्काळी टापूत सर्वाधिक संख्येने दिसणारे लांडगे आता नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने सैरभैर झाले आहेत. तुंग, समडोळी, डिग्रजपट्टा सारख्या बागायती टापूत देखील अन्नाच्या शोधात लांडगे शिवार ओलांडून गावात, शेतशिवारातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत.
खरे तर केवळ जंगलापुरताच मर्यादित अधिवास असलेला लांडगा हा तसा श्वानकुळातील लहान चणीचा वन्यप्राणी! मात्र काही दिवसांपासून लांडग्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले सातत्याने वाढू लागले आहेत. यातून शेळ्या-मेंढ्यांचे नाहक बळी जात आहेत. शेतकर्यांना तसेच फिरस्त्या मेंढपाळांना या लांडग्यांचा आर्थिक फटका बसू लागला आहे.
जिल्ह्याच्या शिराळा पश्चिम भागापासून अगदी तासगाव, मणेराजुरीपर्यंत, बागणी, बावची भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच जिल्ह्यातील नदीकाठ मगरींच्या धास्तीखाली वावरतो आहे. हे कमी म्हणून की काय मध्यंतरी दुष्काळी तासगाव पूर्व भागात गव्याच्या जोडीने धुमाकूळ घातला. तर आता लांडग्यांच्या हल्ल्यांनी अवघे ग्रामीण जगत भयभीत झाले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर वनविभागाकडे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी असलेली अत्याधुनिक यंत्रणादेखील तोकडी पडू शकते याचा धडा येऊ लागला आहे.
जिल्ह्यात मगर, गवा आणि आता बिबट्या आणि जोडीला लांडगे हे सारेच वन्यप्राणी आता बिनधास्तपणे आणि खुलेआम नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. वारणा – कृष्णा पात्रात मगरींचा तर सुळसुळाट झाला आहे. गवा हा खरे तर निबीड जंगलातील प्राणी! पण गवादेखील जंगलापासून कोसोमैल दूर असलेल्या तासगाव पूर्वभागात देखील जोडी – जोडीने धुमाकूळ घालू लागला आहे. हे चित्रच भीतीदायक आहे. मागील आठवड्यात तर शिगावच्या वेशीवर गवा आला होता.
वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ लागला आहे. यातून सैरभैर झालेले हे वन्यप्राणी अन्न आणि निवार्याच्या शोधात जंगलाबाहेर पडू लागले आहेत. वन्यप्राण्यांची अन्नसाखळी मोडली जात आहे. यातूनच अन्नाच्या शोधासाठी वन्यजीव पाळीव प्राण्यांचा फडशा पाडत
आहेत.
जंगलातील वन्यप्राणी अपघाताने 'बाहेर' आला हे कोणीही समजू शकते. मात्र, सातत्याने बिबट्या चांदोलीच्या जंगलातून बाहेर पडला आहे. पूर्वभागात लांडगा गावागावांत शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करू लागला आहे. मात्र, या लांडग्यांचा बंदोबस्त करणे वनविभागाला शक्य झाले नाही. मध्यंतरी केवळ नदीतील मगरींचे सर्वेक्षण करण्याची मोहीम तेवढी वनविभागाने राबवली, मात्र नंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही!
प्रामुख्याने जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तसेच तासगाव तालुक्यातील डोंगराळ भागालगतच्या गावात लांडगे पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर दोन दिवसांपूर्वी तुंग येथेच शिवारात लांडगा येऊ शकतो हे प्रत्यक्ष लांडग्याने दीड डझन शेळ्या – मेंढ्यांचा फडशा पाडला आहे.
लांडगा हा श्वान कुळातील लहानशा चणीचा मांसाहारी प्राणी आहे. लांडग्यांच्या 40 उपप्रजाती आहेत. यातील जिल्ह्यात आढळणारा लांडगा हा करडा लांडगा (Canis lupus) ही सर्वात मोठी प्रजाती मानली जाते.
प्रजाती : कॅनिस जातकुळीमधील जॅकल, कायोटी, कुत्रा व डिंगो हे प्राणी वगळून अन्य प्राण्यांना लांडगा म्हटले जाते.