

सांगली : प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्यासाठी जिल्ह्यात जीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची ग्रामीण भागात कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठेकेदारांना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्ह्यात सुमारे 100 कोटींची गरज असताना मार्च अखेरीस अवघे दहा - बारा कोटींचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. अजूनही सुमारे 90 कोटींचा निधी थकीत आहे. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. हातात निधीच नसल्याने या योजनेच्या कामांची गती संथ झाली आहे.
केंद्र शासनाच्यावतीने ‘हर घर नल, हर घर जल’, या योजनेअंतर्गत जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात सुमारे 683 कामे आहेत. त्यापैकी 363 कामे पूर्ण झाली आहेत, तर 320 कामे सुरू आहेत. या कामांसाठी निधीची गरज आहे. मार्चअखेर या कामांसाठी सुमारे 100 कोटींची निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अवघे दहा-बारा कोटी शासनाकडून मिळाले आहेत. त्यामुळे ठेकेदारांची बिले प्रलंबित राहिली आहेत. तसेच ठेकेदारांना पैसे द्यायचे कसे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी ठेकेदार संघटनेने बिले न मिळाल्यास कामे थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र 31 मार्चपर्यंत मोठ्या अपेक्षेने ठेकेदार शासनाकडे डोळे लावून बसले होते. मात्र ठेकेदारांना हातात पैसेच नसल्यामुळे आता पुढे कामे करायचे कसे, असा गंभीर प्रश्न उभा झाला आहे.
शासनाकडून 31 मार्चपर्यंत थकीत बिले अदा केली जातात, असा अनुभव आहे. मात्र यंदा पैसे न आल्याने ठेकेदारांची निराशा झाली आहे. जिल्ह्यात सध्या 320 कामे सुरू आहेत, मात्र ठेकेदारकडेच निधीची वानवा असल्यामुळे ही कामे संथ गतीने सुरू आहेत. बिलच मिळाली नसल्याने ठेकेदारांनी उसनवारी करून आणले देणी द्यायची कशी, कामगारांना पगार द्यायचा कसा, असाही प्रश्न उभा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची गती संथ होणार आहे.