

कडेगाव/वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील पल्लवी नितीन शिंदे (वय 9 वर्षे) या शाळकरी मुलीचा घराजवळ आंब्याच्या झाडास गळफास लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. 25 रोजी रात्री उघडकीस आली. प्राथमिक तपासात तिला खेळताना गळफास लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिस तपास करत आहेत.
वांगी येथील मोकळे मळा परिसरातील वस्तीवर नितीन शंकर शिंदे कुटुंबीयांसह राहतात. मंगळवारी सायंकाळी त्यांची मुलगी पल्लवी घराबाहेर गेली होती. यादरम्यान आई घरात काम करत होती, तर नितीन मुलास घेऊन कराडला गेले होते. आजोबादेखील बाहेर गेले होते. पल्लवी बराच वेळ परत आली नाही, त्यामुळे आईने तिचा शोध सुरू केला, मात्र ती सापडली नाही. वस्तीवरील अन्य नातेवाईकही तिच्या शोधासाठी बाहेर पडले. रात्री उशिरा घराजवळ आंब्याच्या झुडपात गळफास लागलेल्या अवस्थेत पल्लवी आढळून आली. कुटुंबीयांनी तत्काळ तिला चिंचणी-वांगी ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, मिरज शासकीय महाविद्यालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ओढणीने गळफास लागून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात व फॉरेन्सिक लॅबमधील तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी उपअधीक्षक विपुल पाटील यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे तपास करीत आहेत.