धीर सोडू नका..सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : जयंत पाटील | पुढारी

धीर सोडू नका..सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : जयंत पाटील

वाळवा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यांतील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली व शेतकर्‍यांना दिलासा दिला.

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तर बर्‍याच बागांमधील द्राक्षमणी तडकले. यामुळे नुकसान झाले. ना. जयंत पाटील यांनी वाळवा, पलूस, येळावी, निमणी, मणेराजुरी आदी परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी केली. चिखल तुडवत प्रत्यक्ष द्राक्ष बागांमध्ये जावून नुकसानीची पाहणी केली. वाळवा येथे त्यांच्यासोबत प्रांताधिकारी संपत खिलारी, अप्पर तहसीलदार भांबुरे, ता. पं. उपसभापती नेताजी पाटील, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक चंद्रशेखर शेळके, वर्धमान मगदूम, प्रशांत थोरात, हर्षवर्धन पाटील, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

कर्जवसुली व वीज बिल वसुली तातडीने थांबवावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नेताजी पाटील, चंद्रशेखर शेळके, नंदकुमार शेळके यांनीही शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. ना. जयंत पाटील यांनी संबंधित विभागाला द्राक्षांचे पंचनामे तातडीने करावेत, असे आदेश दिले. तालुका कृषी अधिकारी माने आदी उपस्थित होते.

वीज कनेक्शन तोडू नका…

महावितरण कंपनी शेतकर्‍यांची वीज कनेक्शने तोडून सक्तीने वीज बिलाची वसुली करीत आहेत. ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्यांची बिले येताच वीज बिल भरण्यात तयार आहेत. कंपनीने त्यासाठी सवलत द्यावी. द्राक्ष बागांवरती औषध फवारणीसाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे वीज कनेक्शन तोडू नये. तोडलेली कनेक्शन तातडीने जोडावीत. द्राक्षाच्या संरक्षणासाठी कागद वापरला जातो त्यासाठी अनुदान मिळावे, अशा मागण्या यावेळी शेतकर्‍यांनी केल्या.

Back to top button