सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर | पुढारी

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी शून्यावर आली; परंतु परदेशातून आलेल्या-गेलेल्यांचे रिपोर्ट रविवारी येणार आहेत. तसेच कर्नाटक सीमाभागातून नागरिकांची ये-जा सुरू असल्याने जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव होण्याची धास्ती कायम आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटांनी तीव्र स्वरूप धारण केले होते. या दोन्ही लाटांत सुमारे दोन लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातील एक लाख 95 हजार जण कोरोनामुक्त झाले. तसेच 5397 जणांचे बळी गेले. याबरोबरच म्युकर मायकोसिसची 406 जणांना लागण झाली होती. यातील 61 जणांचा मृत्यू झाला. या दुसर्‍या लाटेची रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. गेली आठवडाभर दररोज केवळ चार-पाच रुग्ण आढळत होते.

आज मात्र ही रुग्णसंख्या शून्यावर आली. आज 579 जणांची आरटीपीसीआर व 741 जणांची अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली; पण जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात एकही रुग्ण आज मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळाला आहे; परंतु ओमायक्रॉन हा नवीन व्हेरिएंटचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जिल्ह्यात 127 जण परदेशांतून आले होते. यातील बहुतांशजण परत गेले आहेत. काहीजण पुणे, मुंबईत आहेत. या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 25 जणांचे रिर्पोट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित जणांचे रिर्पोट रविवार, दि. 5 रोजी येणार आहेत. विमानतळावरून काटेकोर तपासणी झाली आल्याने बहुतांश जणांचे अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे.

मात्र शेजारील कर्नाटक राज्यात ओमायक्रॉनचे काही रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी घातली आहे. परंतु कर्नाटकातील शेकडो प्रवाशी दररोज सांगली जिल्ह्यात येत आहेत. मिरज, जत तालुक्यातील अनेक सीमावर्ती भागातून अनेकजण जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button