

तासगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील व्यापारी अनिलकुमार पांडुरंग पाटील यांच्या बेदाणा व्यवहारात केलेल्या 80 लाखांच्या फसवणूकप्रकरणी कर्नाटकातील तिघांना तासगाव पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी फसवणूक करणार्या 15 जणांविरोधात गेल्या 3 जानेवारी रोजी तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी पाटील यांचे तासगाव बाजार समिती आवारात मंगलम् ट्रेडर्स नावाचे बेदाणा अडत दुकान आहे. त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन यातील मुख्य संशयित श्रीधर हा बेदाणा विक्रीसाठी पाटील यांच्या अडत दुकानात येत होता. त्यातून श्रीधरने पाटील यांचा विश्वास संपादन केला. जमखंडी भागात बेदाणा उत्पादक शेतकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची ओळख करून देऊन तुमच्या अडत दुकानात बेदाणा विक्रीसाठी आणून देतो, असे पाटील यांना सांगितले होते. फिर्यादी पाटील हे श्रीधर याच्यासमवेत जमखंडी भागात गेले असता, संशयित श्रीधरने पाटील यांची काही बेदाणा उत्पादक शेतकर्यांशी भेट घडवून आणली. त्याशिवाय या भागात बेदाणा युनिटची उभारणी केल्यास मोठा नफा मिळेल. शिवाय सर्व उत्पादित बेदाणा तुमच्या अडत दुकानात विक्रीसाठी पाठवितो, असे आमिष दाखविले होते.
फिर्यादी पाटील यांनी बेदाणा निर्मिती युनिटसाठी श्रीधरला 53 लाख 23 हजार 168 रुपये अनामत म्हणून दिले. संशयित जगदीश हुगार याला 6 लाख 85 हजार रुपये व राजेश नंदप्पा गौरोजी याला 2 लाख रुपये अनामत म्हणून आगाऊ रक्कम दिली. मुख्य संशयित श्रीधर याने बेदाणा निटिंगमध्ये होणारा निम्मा नफा देण्याचे व उत्पादित होणारा बेदाणा पाटील यांच्या अडत दुकानात विक्रीसाठी पाठविण्याचे ठरले होते. तसेच संशयित जगदीश व राजेश यांनीही बेदाणा विक्रीसाठी पाटील यांच्या अडत दुकानात पाठविण्याचे ठरले होते. संशयितांनी आगाऊ रक्कम पाटील यांच्याकडून घेऊनही त्यांना बेदाणा दिला नाही. शिवाय आगाऊ घेतलेली रक्कमही परत दिली नाही. त्यामुळे संशयितांनी फसवणूक केल्याची खात्री झाल्याने अनिलकुमार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. संशयितांना अटक करण्यात पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, कॉन्स्टेबल हणमंत गवळी व जयराम चव्हाण यांनी सहभाग घेतला.
मुख्य संशयित श्रीधर बसाप्पा कासार, जगदीश हणमंत हुगार व राजेश नंदप्पा गौरोजी (तिघे रा. तोडलबागी, ता. जमखंडी, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील 12 जण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.