सांगली जिल्ह्याच्या सानिका चाफे हिला हिमाचल प्रदेशचा मानाचा ‘इला’ पुरस्कार | पुढारी

सांगली जिल्ह्याच्या सानिका चाफे हिला हिमाचल प्रदेशचा मानाचा 'इला' पुरस्कार

विटा : पुढारी वृत्तसेवा

खो खो खेळाची महाराष्ट्राची किशोरी संघाची कर्णधार सानिका चाफेला सर्वोत्तम राष्ट्रीय खेळाडू म्हणून दिला जाणारा मानाचा इला पुरस्कार मिळाला आहे. ती सांगली जिल्ह्यातील भिकवडी बुद्रुक (ता. खानापूर) येथील रहिवासी आहे. सानिका चाफे हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उना (हिमाचल प्रदेश) येथे २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात झालेल्या ३९ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो खो स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब या अंतिम सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार सानिका चाफे हिने ५ मिनिटे ५ सेकंद संरक्षण केले तर आक्रमणात तीन गडी बाद केले. तसेच हा सामना जिंकून राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. यावेळी भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मानाचा इला पुरस्कार सानिकाला हिमाचल प्रदेशचे मंत्री विरेंद्र केवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सानिका ही जि. प.  शाळा भिकवडी बु. ची माजी विद्यार्थानी असून, सध्या ती विट्यात आदर्श माध्यमिक विद्यामंदिर शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहे. राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळताच भारतीय खो-खो महासंघाचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र खो खो असोसिएसचे सर्व पदाधिकारी तसेच सांगली जिल्हा खो खो संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यांसह जिल्ह्यातील खो-खो प्रेमींनी तिचे अभिनंदन केले.

सानिकाला प्रशिक्षक समीर माने, दत्ता पाटील, अतुल माने, किरण पवार, विश्वनाथ कचरे, रणजित पाटील, अशोक काळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच भिकवडी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, आई रेणुका आणि वडील श्रावण यांचे प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत आहे. आता राष्ट्रीय पातळीवरील खोखोचा सर्वोच्च पुरस्कार सांगली जिल्ह्याला तब्बल ३५ वर्षांनी मिळाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार १९८६ मध्ये विट्याच्या सुनिता रसाळ यांना मिळाला होता.

Back to top button