अपेक्षित काम न झाल्यामुळे अग्रणीचा उगम कोरडाच : डॉ. राजेंद्र सिंह राणा यांची खंत | पुढारी

अपेक्षित काम न झाल्यामुळे अग्रणीचा उगम कोरडाच : डॉ. राजेंद्र सिंह राणा यांची खंत

विटा; पुढारी वृत्तसेवा : अग्रणी नदीचे पुनर्जीवन करताना उगमाच्या ठिकाणी अपेक्षित काम न झाल्यामुळे नदी वाहते, मात्र उगम कोरडाच राहतो अशी परिस्थिती झाल्याची खंत प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातील अडसडवाडी (तामखडी) (ता.खानापूर) येथे प्रख्यात जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी आज बुधवारी जलबिरादरी पथका सह भेट दिली. या पथकात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्यासह नरेंद्र चुग,अंकुश नारायणकर, वर्धा येथील जलसंधारण विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता सुनील राहणे, श्रीकांत इंगळहळेकर आदींचा समावेश होता. डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, कोणत्याही नदीचे पुनर्जीवन करताना माथा ते पायथा असा टप्प्याटप्प्याने कामांचा प्रवास करायचा असतो. मात्र सन २०१३ पासून २०१५ अग्रणी नदीचे पुनर्जीवन करताना माथ्याच्या ठिकाणी पाणी आडवणे, साठवणे आणि पुढे प्रवाहित करणे ही कामे झालेली नाहीत. परिणामी अग्रणीचा उगम अजून कोरडाच राहतो आहे. माथ्याकडील अगस्ती नगर, अडसरवाडी, ऐनवाडी, जाधवनगर पर्यंतच्या नदीच्या पात्रात पाणी साठपा होत नाही. मात्र तेथून खालच्या बलवडी, बेणापूर, सुलतानगादे, करंजे आणि पुढे सिद्धेवाडी तलावापर्यंत पाणी दिसत आहे. एकतर या भागामध्ये बंधारे आहेत आणि दुसरे म्हणजे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी बलवडी पासून पुढे नदी पात्रात सोडले जाते, त्यामुळे नदी प्रवाहित होण्यास मदत मिळते असेही डॉ. राणा म्हणाले. यावेळी करंजे गावचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ सूर्यवंशी यांनी उगमाच्या ठिकाणी आणि टेंभू योजनेपासून वंचित गावांना एकत्र करत पुन्हा अग्रणी उगमावर नदी पुनर्जीवन करण्याचे आणि उर्वरित गावांना पाणी तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जलबिरादरीने पुन्हा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यावर डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी अग्रणी नदीच्या उगमाच्या ठिकाणी काही खासगी शेत जमीन मिळाली, तर त्या ठिकाणी छोटासा तलाव उभारून पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्न करता येतील असे अगस्तीनगर गावचे सरपंच दाजी पवार यांना सांगितले. दरम्यान, सरपंच दाजी पवार यांनीही त्यांना सकारात्मक प्रति साद देत जागा उपलब्धतेबाबत लवकरच काम सुरू करू अशी ग्वाही दिली. यावेळी अगस्ती मंदिर येथे दर्शन घेऊन करंजे येथील नवीन बंधारा आणि वाघदरा तलावाची पाहणी केली. संबंधित कामाबाबत काही सूचना दिल्या. तसेच गेल्यावर्षी करंजे येथे बंधाऱ्यासाठी नवीन ७९ लाख रुपये मंजूर करण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल राजेंद्रसिंह राणा यांचा सन्मान करंजेच्या ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. यावेळी जालिंदर पवार, गोपीनाथ सूर्यवंशी, संदीप बाबर, जगन्नाथ सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, सागर मेटकरी, दिलीप विठोबा माने, महादेव माने आदी शेतकरी उपस्थित होते.

Back to top button