अजित पवार तासगावकरांवर नाराज; स्वागतासाठी गाडीतून उतरण्यास दिला नकार | पुढारी

अजित पवार तासगावकरांवर नाराज; स्वागतासाठी गाडीतून उतरण्यास दिला नकार

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : विटा येथे दौऱ्यानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यादरम्यान तासगावमधून जाताना तासगावकरानी त्यांचे स्वागत केले. शरद पवार यांची राष्ट्रवादी, अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच भाजपचे पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या ठिकाणीं स्वागत केले. विटा नाका येथे युवानेते प्रभाकर पाटील यांच्याकडून अजित पवार यांनी गाडीतून उतरून सत्कार स्वीकारला. मात्र अन्य दोन्ही ठिकाणी त्यांनी गाडीतून उतरण्यास नकार दिला. अवघे दोन मिनिट थांबून शुभेच्छा स्वीकारून ते निघून गेले. त्यानंतर कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले.

तासगाव तालुक्याने नेहमीच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. स्व. आर. आर. पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यासह मोठी पदे दिली. मात्र अजित पवार व शरद पवार यांच्यात झालेल्या फुटीनंतर आमदार सुमनताई पाटील यांच्यासह तासगाव शहरासह तालुक्याने शरद पवार यांना साथ दिली. यामुळे अजित पवार तासगाव तालुक्यावर नाराज असल्याचे चर्चेत होते.

दरम्यान वायफळे येथील साहेबराव पाटील, निमणी येथील आर. डी. पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार विटावरून जात असताना तासगावमध्ये त्यांचे तिन्ही गटाकडून स्वागत करण्यात आले. मात्र शरद पवार राष्ट्रवादी गटावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजले. स्व. आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यास नकार दिल्याचे समजते. दरम्यान यावरून अजित पवारांनी आमदार सुमनताई पाटील गटावर नाराजी दाखवून दिल्याची चर्चा तासगावमध्ये सुरु होती.

Back to top button