सांगली : आमदार विक्रम सावंत यांचा पराभव करणारे प्रकाश जमदाडे आहेत तरी कोण? | पुढारी

सांगली : आमदार विक्रम सावंत यांचा पराभव करणारे प्रकाश जमदाडे आहेत तरी कोण?

जत; विजय रूपनूर

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देणारा निकाल लागला आहे. जत तालुक्यातून सहकारी संस्था गटातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक , राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे जवळचे नातलग अशी ओळख असलेल्या विद्यमान आमदार विक्रम सावंत हे ५ मताने पराभूत झाले आहेत. आमदार सावंत यांना ४० मते तर भाजपचे उमेदवार केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक सदस्य प्रकाश जमदाडे यांनी ४५ मते मिळवून दणदणीत विजय प्राप्त केला. हा निकाल भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारा असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्रकाश जमदाडे हे जत तालुक्यातील येळवी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व ,नेतृत्व आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या राजकीय दोन दशकाहून अधिक राजकीय काळातील कारर्किर्दीत जगताप यांचा सहवास लाभला आहे. रोजगार हमीवरील मजूर ते जीवन प्राधिकरणमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची नोकरी, नोकरीचा राजीनामा देऊन दुय्यम बाजार आवार सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती, ते जिल्हा बँकेचे संचालक असा थक्क राजकीय प्रवास प्रकाश जमदाडे यांनी केला आहे. ते सध्या आमदार सावंत यांचा पराभव केल्याने चर्चेतला चेहरा बनले आहेत. विशेष म्हणजे जमदाडे हे स्वतः कधीही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत.

जमदाडे यांनी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संख येथे शेतकरी मेळावा घेऊन शिलेदारासह राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता. परंतु जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी विनंती केली होती.तसे न झाल्याने कार्यकर्ते देखील नाराज झाले होते. जतची संस्था गटातील जागा महाविकास आघाडीने विद्यमान आमदार सावंत यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीत सावंत यांच्या विषयी असलेली नाराजी, मतदारांच्यात असलेली नकारघंटा हेच नेमके हेरून जमदाडे यांनी उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत ठेवला. राष्ट्रवादीतून बंड करीत माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित शेतकरी पॅनेल मधून उमेदवारी कायम ठेवली .

भाजपकडे असणारे मतदारांची संख्याबळ विजयाकडे नेणारे नव्हते. राष्ट्रवादीतील नाराज नेते व मतदार यांना गळ घालण्यात माजी आमदार जगताप व जमदाडे यशस्वी झाले . काँग्रेसने ८५ पैकी महाविकास आघाडीचे ५६ मतदार असल्याने आमदार सावंत विजयी होणार असल्याचा दावा केला होता. दरम्यान आमदार सावंत यांचा करेक्ट कार्यक्रम भाजप करणार असल्याचे सांगत जमदाडे ५० हून अधिक मते घेऊन निवडून येणार असल्याचे माजी आमदार जगताप यांनी सांगितले होते. त्यानुसार जमदाडे एकूण ४५ मते घेऊन विजय झाले आहेत. त्यांच्या या विजयाने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Back to top button