Rohit Patil : तासगावात रोहित पाटील यांची जल्लोषात मिरवणूक; एमआयडीसी मंजूरीनंतर कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव | पुढारी

Rohit Patil : तासगावात रोहित पाटील यांची जल्लोषात मिरवणूक; एमआयडीसी मंजूरीनंतर कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

तासगाव शहर; पुढारी वृत्तसेवा : आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आमच्या विरोधकांना लागली आहे. टेंभू योजनेच्या विषयात गेली दीड वर्षे रखडलेला शासन आदेश आमच्या आणि शेतकऱ्यांच्या उपोषणानंतर निघाला. मग गेली दीड वर्षे शासन झोपले होते काय, असा सवाल करत खासदार संजय पाटील हे फुकटचे श्रेय घेत आहेत, असा आरोप रोहीत पाटील यांनी नाव न घेता केला.

तासगावातील योगेवाडी येथे एम आय डी सी मंजूर करुन आणल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते रोहित पाटील यांचा सत्कार व मिरवणूक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सांगता सभेत रोहीत पाटील बोलत होते. दरम्यान तासगाव शहरातून काढण्यात आलेली मिरवणुक व जेसीबीतून फुलांचा वर्षाव करून हजारो युवकांनी आनंद व्यक्त केला.

वर्ष 1997 पासून तासगाव तालुक्यात एमआयडीसी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात एम आय डी सी झाल्या मात्र तासगाव तालुक्यात एमआयडीसी नाही. आर आर पाटील यांनी पंच तारांकित एमआयडीसीचे नियोजन केले मात्र राजकीय विरोधाने ते होवू शकले नाही. आर आर पाटील यांच्या नंतर आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनी हा विषय लावून धरला.

अखेर योगेवाडी एम आय डी सी साठी पायाभूत सुविधा देण्याचा आदेश निघाला. या पार्श्वभूमीवर आज रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आणि तालुक्यातील युवकांच्या वतीने तासगाव शहरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सांगली नाका येथे अभूतपूर्व उत्साहात त्यांच्यावर अक्षरशः जेसीबी मधून पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तासगाव शहरातील प्रमुख मार्गावरून रोहित पाटील यांची चालत मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आर आर पाटील यांच्या पुतळ्याना त्यानी पुष्पहार घालून अभिवादन केले. मिरवणुकीची सांगता वरचे गल्ली येथे सभेने करण्यात आली. मिरवणुकीत युवकांचा मोठा सहभाग होता.

यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी मोठा विरोध होवुनही आर. आर. आबांचे एम. आय डी सी च स्वप्न साकार झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून तालुक्यातील युवकांची मागणी पूर्ण होत आहे असे प्रतिपादन केले. पाण्याचा प्रश्न सुटला आहे आता रोजगाराचाही प्रश्न सुटेल असे ते म्हणाले.

यावेळी ताजुद्दिन तांबोळी, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, अजय पाटील, अभिजीत पाटील, अक्षय धाबुगडे, दीपक उनउने, इद्रिस मुल्ला, नुसार मुल्ला, मारुती गुरव, बबनराव जमदाडे, ॲड. गजानन खुजट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button