सांगली : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत बुधवारी चुरशीने 71.57 टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. रात्री सव्वादहाच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने हा टक्का जाहीर केला. 2014 मध्ये 71.36 टक्के, तर 2019 मध्ये 67.39 टक्के मतदान झाले होते. तुलनेत 71.57 हा टक्का उच्चांकी ठरला. वादावादीचे किरकोळ प्रकार घडले.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सुमारे दहा गावांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जिल्ह्यात 21 ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली, ती तत्काळ बदलली. अदखलपात्र चार गुन्ह्यांची नोंद झाली. निवडणूक निकालाची उत्सुकता ताणली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 63.28 टक्के मतदान झाले. एकूण 25 लाख 36 हजार 65 मतदारांपैकी 16 लाख 4 हजार 816 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 8 लाख 10 हजार 819 पुरुष, 7 लाख 93 हजार 950 महिला व इतर 47 यांनी मतदान केले. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे दहा गावांमध्ये मतदार यादीतील नाव शोधणे, संथगतीने मतदान यांसह काही ठिकाणी मतदार उशिरानेच मोठ्या संख्येने आल्याने मतदान लांबले.
तासगाव, जतसह इतर तालुक्यांत एकूण 21 ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. त्यामुळे 21 ठिकाणी व्हीव्हीपॅट, 14 ठिकाणी बॅलेट युनिट आणि 12 ठिकाणी कंट्रोल युनिटची यंत्रे बदलावी लागली. बुधवारी दिवसभरात चार ठिकाणी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. याबाबत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. चिंचणी- वांगीमध्ये मतदान केंद्रात एका उमेदवाराचा प्रतिनिधी प्रचार करताना आढळल्याने त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला. एका ठिकाणी व्हिडीओ शूटिंग करण्यात येत होते. सांगली शहरामध्ये गत निवडणुकीतील एका नेत्याचे भाषण इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. हा गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद केला.
जिल्ह्यात विधानसभेच्या आठही मतदारसंघात मोठ्या चुरशीने निवडणूक प्रचार झाला होता. गेला महिनाभर प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज, वरिष्ठ नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. प्रचाराचा धुरळा उडाला होता. या प्रचाराची चुरस बुधवारी मतदानात दिसून आली.
आठही मतदारसंघातील लढती तुल्यबळ आहेत. हेवीवेट लढतींमुळे निकाल काय लागणार? महाविकास आघाडीला किती जागा मिळणार, महायुती किती जागांवर जिंकणार, यासह तासगाव-कवठेमहांकाळ, इस्लामपूर, जत, खानापूर, पलूस-कडेगाव, शिराळा, सांगली आणि मिरज या आठ मतदारसंघात काय होणार, याकडे जिल्ह्याबरोबरच राज्याचे लक्ष आहे.
तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) यांच्यात चुरशीचा सामना आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची ही पहिलीच निवडणूक. याठिकाणी काय निकाल लागणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.
इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. या मतदारसंघात अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
शिराळा व खानापूर मतदारसंघात चुरशीने मतदान झाले आहे. शिराळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख अशी एकास एक लढत असून, आता निकालाकडे लक्ष लागले आहे. खानापुरात शिवसेनेचे सुहास बाबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील आणि अपक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यातील लढतीच्या निकालाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम व भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यात एकास एक लढत होत आहे. याठिकाणी चुरशीने मतदान झाले. जत मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत, भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी-पाटील यांच्यात चुरशीने लढत झाली. हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.
सांगलीत भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील व काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत सांगलीत मतदान कमी झाले, तरीही चुरस आहे. तिरंगी लढतीमुळे निकालाकडे लक्ष लागले आहे. मिरजेत भाजपचे उमेदवार सुरेश खाडे व शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यातील लढतीकडेही लक्ष लागले आहे.