पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार अर्पण सांगलीतील सत्ता संपादन सभेला सुरुवात केली. सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ही सभा पार पडली. दरम्यान, टिपू सुलतानच्या फोटोला हार अर्पण करत सभेला सुरुवात केल्याने नव्या वादला तोंड फुटले आहे. टिपू सुलतानच्या फोटोला हार घालणे, उद्धव ठाकरेंना चालते का? असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकर या वेळी बोलताना म्हणाले, राज्यात एक अदृश्य शक्ती आहे, जी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करु पाहत आहे. धनगर समाजाचाही आरक्षणाचा मुद्द पुढे आला आहे. ३ डिसेंबर रोजी चार राज्यांच्या निवडणुकीचे निकाल समोर येतील. त्यानंतर आम्ही अयोध्येतून नव्या मोहिमेला सुरुवात करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत तीन दिवसांनी मी सविस्तर भूमिका मांडेल. मराठा आरक्षण हा निझामी मराठा आणि रयतेचा मराठा असा लढा आहे. गेली ७० वर्षे सत्तेत असणार्या निझामी मराठ्यांनी रयतेतील मराठ्यावर अन्याय केलाय. मनोज जरांगे-पाटील हे रयतेतल्या मराठ्यांचे नेतृत्व करीत आहेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.