

जत; पुढारी वृत्तसेवा : स्वस्तात कमी दराने सोने देतो म्हणून जत तालुक्यातील सोने फसवणूक प्रकरणातील चौथे प्रकरण आज उघडकीस आले आहे. स्वस्तात सोने देतो म्हणून जत शहरातील एकाची ८ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार जत पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद मोहन संगप्पा कांबळे यांनी दिली आहे. या तक्रारीनंतर दर्याप्पा यल्लाप्पा हवीनाळ व मेहबूब रमजान शेख (रा. दोघेही जत) या दोघाविरुद्ध फसवणुकीचा चौथा गुन्हा आज दाखल झाला आहे. त्यामु महिन्यातील या दोघाविरुद्ध फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत शहरातील मोहन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दर्याप्पा हवीनाळ व मेहबूब रमजान शेख या दोघांनी कांबळे यांना स्वस्तात सोने देतो म्हणून डिसेंबर २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत वारंवार ८ लाख रुपये घेतले. परंतु सोने तर दिले नाहीच नंतर पैसेही परत केले नाहीत. हळूहळू ते दोघे पैसे देण्यास टाळाटाळ देखील करु लागले.
२ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या साडे सव्वीस लाखांच्या सोने फसवणूक प्रकरणी हवीनाळ आणि शेख हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी अशी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मोहन कांबळे यांनी जत पोलिसात धाव घेतली व ८ लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या घटनांच्या वाढत्या आकड्यामुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.