

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व तलाव टंचाईमधून भरावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
रवी पाटील म्हणाले की, पालकमंत्री हे भाजपचे आहेत पूर्वी ते जत विधानसभा मतदारसंघातून आमदार देखील झाले होते. मात्र जत तालुक्याकडे त्यांच्याकडून सातत्याने कानाडोळा होत आहे. सध्या तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्याकडून पाणीपट्टी वसूल केली जात आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. टंचाईग्रस्त भागास पाणी उपलब्ध करून देणे ही पालकमंत्री व प्रशासनाची जबाबदारी आहे. दुष्काळी भागाला पाणी देताना असा अन्याय होत असेल तर जनतेसाठी आपण रस्त्यावर उतरू, असा इशाराही रवी पाटील यांनी दिला.
जत तालुक्यातील जवळजवळ सर्व तलाव कोरडे पडत आहेत. दहा तलावामध्ये थेंबभरही पाणी नाही. अनेक तलावाची पाणी पातळी मृतसंचय पातळीच्या खाली गेली आहे. आगामी सहा सात महिन्यांमध्ये टँकर भरणे व जनावरांना पाणी देणेही अत्यंत कठीण होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या म्हैसाळ आवर्तनामधून सर्व तलाव भरणे आवश्यक आहे. तसेच आवर्तनाची मुदतही वाढवण्याची गरज आहे. तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याबाबत व पशुधनाबाबत पशुसंवर्धन विभागाने अत्यंत चुकीचा अहवाल दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुपालक यांच्यावर अन्याय होत आहे. तालुक्यात चारा टंचाई असल्याने पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी रवी पाटील यांनी केली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून याबाबतचे निवेदन दिले यावेळी प्रदेशाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली आहे.