

जत; पुढारी वृत्तसेवा : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथील एका युवकाचे अपहरण केल्याची घटना आज (दि. २२) उघडकीस आली आहे. शत्रुघ्न धर्मा तांबे (वय २५) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. पतीचे अपहरण झाल्याबाबत सारंगा शत्रुघ्न तांबे यांनी उमदी पोलिसांत तिघाविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली आहे.
उमदी पोलिसांत जालिहाळ खुर्द येथील युवकाची कडेगावमधील तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी नऊ वाजता सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शत्रुघ्न तांबे हे जालिहाळ खुर्द येथील घरी होते. दरम्यान संशयित केतन सावंत, शरद मोरे, खोडे परीष यांनी शत्रुघ्न याला दमदाटी करुन चारचाकीतून नेले. या घटनेनंतर तांबे या तरुणाचा संपर्क होऊ शकला नाही. तांबे याची पत्नी सारंगा तांबे यांनी याबाबत उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी केतन सावंत, शरद मोरे, खोडे परिष (सर्व रा. अमरापुर ता. कडेगाव) यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.