

सांगली ः शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील 218 शाळांमध्ये 1 हजार 359 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या 2 हजार 38 जागांपैकी 679 जागा रिक्त राहिल्या आहेत. पसंतीची शाळा न मिळाल्याने जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती मिळाली.
शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये उपलब्ध जागेच्या 25 टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. शासनाच्या निकषानुसार आरटीईसाठी जिल्ह्यात 218 शाळा यंदा पात्र ठरल्या. या शाळांमध्ये 2 हजार 38 जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. या जागांवर 3246 अर्ज आले होते. नियमित प्रवेशासाठी 1613 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 1080 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर पहिल्या प्रतीक्षा यादीमधून 210 विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश निश्चित केले. तसेच दुसर्या यादीतून 54 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. शासनाने चारवेळा मुदतवाढ देऊन चार प्रतीक्षा यादीत प्रवेश प्रक्रिया राबवली. त्यातून जिल्ह्यात एकूण 2091 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 1359 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. 679 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदाही आरटीईच्या सुमारे 34 टक्के जागा रिक्त राहणार आहेत. पसंतीची शाळा न मिळाल्याने यातील बर्याच जागा रिक्त राहिल्या आहेत, असे सांगण्यात येते.