सांगली : अल्पवयीन मुलीशी विवाह भोवला, तरुणासह पाचजणांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : अल्पवयीन मुलीशी विवाह भोवला, तरुणासह पाचजणांवर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमानुसार पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने पती,सासू ,सासरे,आई, वडीलासह पाच जणांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी अक्षय हणमंत पाटील, कविता हणमंत पाटील, हणमंत पाटील तिघेही (रा. बाज) सुनिता विठ्ठल डोबाळे (रा. , लोणार ता. कवठेमहकाळ) यांच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण व बालविवाह प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने एका आपत्याला उपजिल्हा रुग्णालय कवठेमंहकाळ येथे जन्म दिल्याने ही घटना उघडकीस आली. सुरुवातीस वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबतची माहिती पोलिसात दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने स्वतःहून पोलिसात फिर्याद दिल्याने खळबळ उडाली आहे

याबाबत अधिक माहिती अशी जत तालुक्यातील पश्चिम भागात एका गावातील तरुण अक्षय पाटील यांने एका अल्पवयीन मुलीशी एका वर्षापूर्वी विवाह केला होता. दरम्यान 27 सप्टेंबर २०३३ रोजी रात्री संबंधित अल्पवयीन मुलीने एका अपत्यास जन्म दिला. याबाबत आरोग्य विभागाने जबाब घेऊन पोलिसात माहिती दिली. पतीने अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे. मुलगी अल्पवयीन असताना देखील सासू-सासरे आई-वडील यांनी विवाह लावून दिल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना जत पोलिसात नोंद असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करीत आहेत.

Back to top button