खानापूरमधील इंडिया आघाडीच्या बैठकीत सत्ताधारी हल्लाबोल : राष्ट्रवादीच्या मुळीक यांनी मांडली गंभीर समस्या | पुढारी

खानापूरमधील इंडिया आघाडीच्या बैठकीत सत्ताधारी हल्लाबोल : राष्ट्रवादीच्या मुळीक यांनी मांडली गंभीर समस्या

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर मतदारसंघातील इंडिया आघाडीची बैठक आज (दि. २६) पार पडली. या बैठकीमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी सत्ताधारी गटावर टीका केली. कोयनेचे आठ टीएमसी पाणी कर्नाटकच्या निवडणूकी साठी सोडायला लावल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते,काँग्रेसचे रविंद्र भिंगारदेवे, गजानन सुतार, संदीप ठोंबरे, सुशांत देवकर, मोहनराव देशमुख, शिवाजी शिंदे, संदिप मुळीक, चंद्रकांत चव्हाण, शहाजी मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत बोलत असताना मुळीक म्हणाले, आगामी काळात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी हे प्रश्न भयंकर रूप घेणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या मंजूरीचे काम बाकी होते. मात्र त्यानंतर काही स्वार्थी मंडळींनी सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी आपले सरकार पाडले. त्यामुळे आजअखेर टेंभूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरीचे काम पूर्ण झालेले नाही असं मुळीक यावेळी म्हणाले.

सध्याचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी :  मुळीक

सध्याचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, त्यांचा जनाधार संपलेला आहे. म्हणूनच जाती धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग करीत आहेत. त्यामुळे आपण आता एकत्रितपणे लोकांचे प्रश्न आणि गरजा चव्हाट्यावर आणण्यासाठी जन आंदोलन उभारणार आहोत. सध्या सरकार निवडणूका टाळत आहे आणि प्रशासकाच्या हातात कारभार देऊन लोकशाहीचा अपमान चालवला आहे. खानापूर पंचायत समितीला तर केवळ ठेकेदारांचा वेढा पडलेला आहे. लोकांची कामे होत नाहीत, त्यामुळे इथून पुढे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीत आम्ही दोन दोन तास जाऊन बसणार आहोत असेही मुळीक यांनी सांगितले.

भाजपकडे स्वतः च्या कर्तृत्वावर मोठी झालेली माणसे नाहीत : संजय विभूते

संजय विभूते म्हणाले, सरकार सर्वच प्रश्नांवर केवळ वेळ मारून नेत आहे. भाजपकडे स्वतः च्या कर्तृत्वावर मोठी झालेली माणसे नाहीत म्हणूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यातील नेत्यांना मांडीवर घेऊन बसले आहेत. शिंदे गटावर टीका करताना बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार वगैरे गप्पा मारणे बंद करा, शिवसेनेचे नाव, चिन्ह तुमच्याकडं आहे, गेल्या वर्षभरात किती शाखा तुम्ही काढल्या? किती गाड्या परवाच्या आझाद मैदानातल्या दसरा सभेला नेल्या? ते जाऊद्या तुम्ही स्वतः तरी तिकडे गेला का? असा सवाल करत जे आज धनुष्यबाण चिन्ह गाड्यांवर लावून फिरताहेत त्यांना लवकरच दुसरी चिन्हं लावावी लागतील असं विभूते यावेळी म्हणाले.

खानापूर मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी

खानापूर मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या बैठकीत संग्राम देशमुख, तानाजी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब भगत, प्रदीप माने पाटील, सुवर्णा पाटील, भूमी कदम, गोपीनाथ सुर्यवंशी, हरी माने, विशाल पाटील, माणिक पाटील, किशोर साळुंखे, सुभाष शिंदे, गणपतराव जाध व, बाळकृष्ण यादव, राज लोखंडे, बाळासो निकम, विनोद साळुंखे , निवास जाधव, यशवंत साळुंखे, मारुती मगर, गौरीशंकर भोसले, मनोहर चव्हाण,अजित खंदारे,सादिक काजी सचिन अडसूळ, खंडेराव जाधव, बापूराव साळुंखे, कृष्णा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button