सांगली : कवठेमहांकाळ शहरात भरदिवसा चोरी; ३६ हजाराची रोखड लंपास | पुढारी

सांगली : कवठेमहांकाळ शहरात भरदिवसा चोरी; ३६ हजाराची रोखड लंपास

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ येथील दादा चौकातील सगरे किराणा स्टोअर्स मधील कॅश काऊंटर मधून ३६ हजार रुपये दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी (दि २७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळ पोलिसात या चोरीची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद दुकानदार अनिल दिगंबर सगरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरुन दोन तरुण चौकातील एका दुकानातून बाहेर पडले. पाच मिनीटात दोघे अनिल सगरे यांच्या किराणा दुकानात आले. काऊंटरवरती पैसे दाखवून पाचशे रूपयाची नोट पाहिजे, अशी मागणी केली.

एका आरोपीने दुकानातील मालाची मागणी केली होती. दुकानदार सगरे यांनी काऊंटर मधून पैसे हातात घेतले व पाचशे रूपयाची नोट शोधू लागले. त्यावेळी एकाने दुकानदार सगरे यांच्या हातातील पैशाचा बंडल हिसकावून घेतला. दुकानदार अनिल सगरे यांनी त्याचा शर्ट पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्या चोरट्यांनी हिसडा देवून ३६ हजार रेपयांचा बंडल घेवून समोरच उभ्या असलेल्या मोटरसायकल वरुन पलायन केले.

अनिल सगरे यांनी आरडाओरडा करत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सगरे. नागरिकांनी त्या आरोपींचा पाठलाग केला. परंतू आरोपी मोटारसायकल वरुन भरधाव वेगात जिल्हा बॅंक, शिवाजी चौक, म्हसोबा गेट मार्गे जुन्या एस.टी.स्टॅड समोरील रस्त्याने भरधाव वेगात निघून गेले आहेत. कवठेमहांकाळ पोलीसानी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिस मार्गावरील सी.सी.टी.व्ही. तपासत आहेत.

Back to top button