मिरजेत चुरशीने 64%, वाढला टक्का

दिवसभर उत्साह : मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही ठिकाणी मशीन बदलले
Maharashtra Assembly Election
मिरज विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी शांततेत सुमारे 65 टक्के इतके मतदान झाले.
Published on: 
Updated on: 

मिरज : मिरज विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी शांततेत सुमारे 65 टक्के इतके मतदान झाले. तांत्रिक बिघाड झाल्याने काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बदलण्यात आली. गतवेळच्या तुलनेत हे मतदान सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे.

निवडणुकीमध्ये यंदा विविध पक्ष व अपक्ष असे एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. भाजप महायुतीचे उमेदवार पालकमंत्री सुरेश खाडे व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यात चुरस दिसली. मिरज मतदारसंघात 3 लाख 43 हजार 876 इतके मतदार होते. त्यापैकी सुमारे 65 टक्के इतक्या मतदारांनी मतदान केले. शहरात 135 मतदान केंद्रांवर व ग्रामीण भागातील 172 मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यापैकी 221 मतदान केंद्रांवर वेबद्वारे शूटिंग करण्यात आले. मिरजचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली 1368 निवडणूक कर्मचार्‍यांनी ही जबाबदारी पार पाडली.

सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात मतदानासाठी अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. 2019 च्या निवडणुकीमध्ये 55.1 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसले. सकाळपासून दुपारपर्यंत मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. दुपारनंतर मात्र रांगा कमी झाल्या होत्या. त्यानंतर अगदी सहा वाजेपर्यंत मतदानासाठी येणार्‍यांची संख्या ही कमी होती.

मिरजेच्या बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये आदर्श मतदान केंद्र होते. महिला कर्मचारीचलित मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचारीचलित मतदान केंद्र, तरुण कर्मचारीचलित मतदान केंद्रेही होती. मतदान करण्यासाठी दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह दिसत होता. प्रकृती ठीक नसलेल्या अनेक उमेदवारांना व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर आणण्यात आले. अनेकांना मतदान स्लिप न मिळाल्याने मतदान केंद्रावर गोंधळ दिसला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला ज्या मतदान केंद्रावर मतदान झाले, तेथे नाव न आल्याने अनेकांचा गोंधळ उडाला.

मालगाव, बेडग, आरग, म्हैसाळ, कवलापूर या मोठ्या गावांसह सोनी, भोसे, कळंबी, सिद्धेवाडी, खंडेराजुरी, सलगरे, बेळंकी, एरंडोली, गुंडेवाडी, मल्लेवाडी, टाकळी, बोलवाड, सुभाषनगर, लिंगनूर, वड्डी, नरवाड, खटाव या गावांमध्येही मतदानासाठी चुरस दिसली.पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्नी सुमन खाडे यांच्यासमवेत मिरजेत मतदान केले. जनसुराज्यचे नेते समित कदम, माजी सभापती सुरेश आवटी, शिवसेनेचे (शिंदे गट) किरणसिंग राजपूत यांच्यासह महायुतीतील नेते व कार्यकर्ते मतदान करवून घेण्यासाठी सक्रिय दिसले. शिवसेना महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांनीही मिरजेत मतदान केले. काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे यांच्यासह आघाडीतील नेते ग्रामीण भागासह शहरात ठाण मांडून होते. खाडे व सातपुते हे दोघेही उमेदवार शहरासह ग्रामीण भागात फिरत होते. खासदार विशाल पाटील यांनीही सायंकाळी मिरज ग्रामीण भाग व शहरात मतदान केंद्रांजवळ भेटी दिल्या.

वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला?

2019 च्या निवडणुकीमध्ये 55.1 टक्के मतदान झाले होते. 2024 च्या निवडणुकीमध्ये मात्र 65 टक्क्यांच्या पुढे हा आकडा गेला आहे. त्यामुळे वाढलेले मतदान हे भाजपच्या पारड्यात पडते की शिवसेनेच्या पारड्यात पडते? याबाबत उत्सुकता आहे.

अशी वाढत गेली मतदानाची टक्केवारी...

सकाळी अकरा वाजेपर्यंत 60 हजार 873 जणांनी (17.70 टक्के) मतदान केले. दुपारी 1 वाजेपर्यंत 1 लाख 6 हजार 26 जणांनी (30.83 टक्के) मतदान केले. 3 वाजेपर्यंत 1 लाख 52 हजार 242 जणांनी (43.98 टक्के) तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 1 लाख 97 हजार 826 जणांनी (57.59 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news