ओबीसी आरक्षण धोक्यात आणणारी सरकार उलथवून टाकू, संग्राम मानेंचा इशारा

ओबीसी आरक्षण धोक्यात आणणारी सरकार उलथवून टाकू, संग्राम मानेंचा इशारा

विटा; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारी सरकार उलथवून टाकू, असा इशारा महाराष्ट्र राज्य ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सरचिटणीस संग्राम माने यांनी दिला आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला कुणबी समाज म्हणून आरक्षण देण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहेत. परंतु यामुळे कुणबी समाजाला ओबीसी समाजामध्ये घालून आरक्षण देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संग्राम माने म्हणाले, आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. सध्या त्यांना खुल्या गटातून त्यांना इ डब्ल्यू एस (आर्थिक दृष्ट्या मागास) चे आरक्षण मिळतेच आहे. तेच वाढवावे किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी कॅटेगरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे. मात्र कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये अशी मागणी आम्ही संबंधित मंत्र्याकडे करणार आहोत.

तसेच, राज्य सरकारने मराठा समाजास कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसी समाजावर अन्याय होईल. राज्य सरकारने अन्यायकारी निर्णय घेतला तर ओबीसी समाज शांत बसणार नाही. जे सरकार आमच्या विरोधात निर्णय घेईल त्या सरकारला पायउतार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

१९३१ च्या जनगणनेनुसार आमची संख्या ५२ टक्के पेक्षा जास्त होती. परंतु त्या नंतरच्या काळात ओबीसी जनगणना झालीच नाही. सध्या आम्ही देशात ६२ टक्के पेक्षा जास्त आहोत. जनगणना न झाल्यामुळे आमच्या समाजाला अनेक गोष्टी मिळण्यापासून वंचित राहिला आहे. तरी यापुढील काळात आमची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देताना ५०% ची मर्यादा वाढवावी. त्यासाठी घटनेत बदल करावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही करत आहोत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news