कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती : केंद्रीय जलायोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांना कर्नाटकाकडून बगल? | पुढारी

कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती : केंद्रीय जलायोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांना कर्नाटकाकडून बगल?

विटा; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना कर्नाटक प्रशासन जाणीवपूर्वक का बगल देत आहे? असा सवाल कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीने विचारला आहे.

याबाबत कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीचे सदस्य आणि निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी या दोन्ही धरणामधील अतिरिक्त पाणी साठ्यामुळे कमी विसर्गामुळे सांगली कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यात महापुराचा धोका उद्भवतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये कमाल पाणीसाठा पावसाळा संपेपर्यंत तरी करायचा नाही असे केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निश्चित केले आहे. याबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात परस्पर समन्वय राखण्याचे मुंबईत २ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ठरले होते. यावेळी कृष्णा महापूर समितीच्या सदस्यांबरोबरच जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर प्रमुख उपस्थित होते. अलमट्टी धरणामध्ये पाणी साठ्याची कमाल उंची ५१९.६० मीटर आणि १२३.०८ टीएमसी अशी आहे. अशा स्थितीतच आज त्या ५१९.६० मीटर उंची (कमाल पाणी पातळी) पर्यंत तेथे पाणी साठवले आहे. तसेच सध्या १२३.८ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे. म्हणजे कर्नाटकाने या धरणामध्ये पाणीसाठ्याची मर्यादा आत्ताच गाठली आहे. त्यामुळे अजून मान्सून संपलेला नाही, थोडा जरी पाऊस झाला तरी कृष्णा खोऱ्याला पुन्हा एकदा महापुराचा धोका संभवू शकतो अशी स्पष्ट शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकचे प्रशासन असे का वागत आहे याबाबत विचारणा करावी अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही लेखी निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती देखील दिवाण आणि केंगार यांनी दिली आहे.

Back to top button