

विटा : पुढारी वृत्तसेवा खानापूर तालुक्यातील भाळवणीत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष बदलावरून आजी-माजी आमदार गटांत वाद झाला. भाळवणी येथे काल (सोमवार) ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष बदलण्याच्या कारणावरून तंटा झाला. पहिले दोन विषय झाल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष बदलाचा विषय आला. त्यावर विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव शिंदे यांना मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव एका गटाने मांडला. मात्र दुसऱ्या गटाने तंटामुक्ती अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. यावरून जोरदार वाद निर्माण झाला.
भाळवणी ग्रामपंचायतमध्ये आमदार अनिल बाबर गटाची सत्ता आहे, तर तंटामुक्ती गटाचे अध्यक्ष हे माजी आमदार सदाशिव पाटील गटाचे आहेत. यामुळे अंतर्गत वाद सुरू होता. त्याचे परिणाम या सभेत दिसले. या ग्रामसभेसाठी दोन्ही गट चांगलीच तयारी करून आलेले होते. त्यामुळे ज्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष चा विषय आला. त्यावेळी वादाला तोंड फुटले व हमरीतुमरीवर आले, पण सत्ताधारी गटाने हा विषयच संपला असल्याचे जाहीर केले. विरोधकांनी मतदान घ्या किंवा आवाजी मताने निवड करा, अशी घोषणाबाजी केली. पण सत्ताधारी गटाने ग्राम सभाच संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे वादावादी वाढली, ती इतकी की दोन्ही गट पार हमरीतुमरीवर आले.
शेवटी दंगा आटोक्यात येत नसल्याने पोलिस बोलाविण्यात आले. त्या नंतर सर्व ग्रामस्थांच्या सह्या घ्याव्यात अशी ग्रामस्थांची मागणी असताना ठराविक लोकांच्याच सह्या सरपंच, ग्रामसेवक यांनी घेतल्या आणि ग्रामसभा संपल्याचे जाहीर करून सरपंच तेथून निघून गेले. यानंतर गटविकास अधिकारी यांनी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना विटा येथे बोलवून बैठक घेतली. या बैठकीत काय निर्णय झाला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
ग्रामसभाच बरखास्त झाली आहे – गटविकास अधिकारी संताजी पाटील
भाळवणी मध्ये ग्रामसभेच्या दरम्यान वाद झाल्याची माहिती ग्रामसेवकांकडून आपल्याला मिळाली. त्यावरून त्यांना आपण पंचायत समिती मध्ये बोलवून घेतले होते. त्यावेळी त्यांना विचारलं असता, त्यांनी या ग्रामसभेमध्ये बाकी सगळ्या विषयांवर चर्चा सुरू असतानाच विषय क्रमांक तीन मध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नेमणे हा विषय होता. याबाबत जुन्या अध्यक्षांना च पुढे चाल द्यावी असे काही लोकांचे म्हणणे होते. मात्र त्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद झाला. त्यानंतर आपण ग्रामसभा बरखास्त केली. त्यामुळे आता पुन्हा नव्याने ग्रामसभा कधी घ्यायची आणि नवीन अध्यक्ष नेमायचा किंवा नाही याबाबत ग्रामसेवक आणि सरपंच समन्वयाने निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनी दिली आहे.