सांगली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिकेची 61 कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये नगरोत्थान, अण्णा भाऊ साठे योजना, दलितेतर विकास योजनेतील 51 कोटी रुपयांची कामे, शासन निधीतील 2 कोटी रुपयांची कामे, तसेच 8 कोटी रुपयांच्या मच्छीमार्केट बांधकामाचा समावेश आहे. मच्छीमार्केट बांधकामाची निविदा प्रक्रिया आचारसंहितेपूर्वीच झाली असून, केवळ कार्यारंभ आदेश देणे बाकी आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (23 नोव्हेंबर) आहे. त्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल. निवडणूक आचारसंहितेत अडकलेली कामे मार्गी लागतील. महापालिकेने नगरोत्थान, अण्णा भाऊ साठे योजना, दलितेतर विकास योजनेतील 51 कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. प्रशासकीय मंजुरीपूर्वीच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती. दरम्यान, शासन निधीतील 2 कोटी रुपयांच्या कामांचाही प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र प्रशासकीय मान्यतेपूर्वीच आचारसंहिता लागू झाली. आता आचारसंहिता शिथिल होताच या कामांचे प्रस्ताव मार्गी लागतील.
सांगलीत मच्छीमार्केटसाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे कार्यारंभ आदेश दिलेला नव्हता, आता आचारसंहिता संपताच मच्छीमार्केट उभारणीसाठी कार्यारंभ आदेश जारी होईल. निवडणूक आचारसंहिता संपताच पुन्हा एकदा महापालिकेत कामांची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे.