सांगलीत दोघांवर खुनी हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

सांगलीत दोघांवर खुनी हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मार्केट यार्ड परिसरात जुन्या वादाच्या कारणातून कोयत्याने डोक्यात, पाठीवर वर्मी वार करून दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात करण संतोष पवार (वय २१ रा. अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा) आणि सुलतान बशीर खलिफा हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चौगुले, अजय खोत, अमित, रुपेश, अर्जुन आणि एक अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की  जखमी करण पवार हा त्याच्या कुटुंबियांसह शिंदे मळा येथील अभिनंदन कॉलनीत राहतो. करण आणि संशयित सहा जणांमध्ये पूर्वी भांडणे झाली होती. संशयित राहुल चौगुले याने करण पवार याला फोन करून मार्केटयार्ड येथील कब्रस्तानजवळ बंद असलेल्या घराच्या टेरीसवर बोलावून घेतले. यानंतर जखमी करण पवार आणि त्याचा मित्र सुलतान खलिफा हे दोघेजण त्याठिकाणी गेले. संशयितांनी दोघांसोबत जुन्या भांडणातून पुन्हा वाद घालण्यास सुरवात केली. दोघांमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर संशयित चौगुले याने कोयत्याने पवार याच्या डोक्यात वार केला. संशयित अजय खोत याने त्याच कोयत्याने पुन्हा वार केले. यावेळी करण याचा मित्र सुलतान खलिफा हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता संशयित खोत यांने कोयत्याने डाव्या बरकडीजवळ वार करुन त्याला जखमी केले. यावेळी इतर संशयितांनी दोघांना लाथाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहा जणाविरुद्ध विश्रामपबाग पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button