सांगली : पावसाळी अधिवेशनापूर्वी पेन्शन द्या अन्यथा जेलभरो आंदोलन; जनता दलाचा इशारा | पुढारी

सांगली : पावसाळी अधिवेशनापूर्वी पेन्शन द्या अन्यथा जेलभरो आंदोलन; जनता दलाचा इशारा

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन त्यांचा अंशतः सन्मान केला. पण साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा मात्र विचारच केलेला नाही. आता केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनापूर्वी घ्यावा अन्यथा २५ जुलैला जेलभरो आणि ३१ जुलैला महाजेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा जनता दलामार्फत देण्यात आला.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबा सागर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी, खानापुर, सांगोला, माळशिरस तालुक्यातील ५०० हून अधिक वयोवृद्ध आणि शेतकऱ्यांनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत आटपाडी बसस्थानका पासून भव्य मोर्चा काढला.

तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी आबा सागर म्हणाले दोन्ही सरकारांनी हिंमत असेल तर शेतकरी सन्मान निधी हा शब्द वगळून पेन्शन असा बदल करावा.शेतकरी आणि वयोवृद्धांच्या पेन्शनसाठी जनता दलाने लढा उभारल्यामुळे केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार तर महाराष्ट्र शासनानेही वर्षाला सहा हजार रुपये सन्मान निधी जाहीर केला.

आता दरमहा ५ हजार पेन्शन दिली पाहिजे. पावसाळी अधिवेशनात या मागणीची पूर्तता झाली पाहिजे. नाहीतर सांगली, आटपाडी, तासगांव, खानापुर, जत, पलुस, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तेरा तालुक्याच्या ठिकाणी २५ रोजी जेलभरो आणि ३१ तारखेला आटपाडी येथे महाजेलभरो आंदोलन केले जाईल.आगामी निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून आम्ही उमेदवार उभे करू.

यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे म्हणाले अधिवेशनात पेन्शन मंजूर नाही झाली तर राज्यात मोठे आंदोलन केले जाईल. हक्काची पेन्शन मिळेपर्यंत जनता दल हा लढा लढत राहील. आपल्या हक्कासाठी जेल भरो आंदोलनात मोठ्या संख्येने हजर राहा असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे डी.एम.पाटील, जनार्दन गोंधळी, माणिक पांढरे,रघुनाथ रास्ते,रामचंद्र कोळेकर आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

Back to top button