Sangli Crime : तलवारी विक्री करणाऱ्या सांगलीतील तरुणास अटक | पुढारी

Sangli Crime : तलवारी विक्री करणाऱ्या सांगलीतील तरुणास अटक

विटा; पुढारी वृत्तसेवा : तासगाव ते आळसंद बायपास रस्त्यावर सांगलीच्या एकास १७ तलवारी घेऊन फिरताना विटा पोलिसांनी अटक केली. भगतसिंग विक्रमसिंग शिख (वय २१ वर्षे रा. जुना कुपवाड रस्ता, नेहरुनगर, सांगली) असे आरोपीचे त्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९ जून) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, तासगाव ते आळसंद बायपास रोडवर एक व्यक्ती तलवारी विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जावुन सापळा रचला असता काही वेळानंतर एक व्यक्ती मोटारसायकलवरुन येत असल्याचे आढळून आली. तिच्यावर संशय आल्याने संबंधित व्यक्तीचा पाठलाग करुन त्याला थांबवून त्याची झडती घेतली. दरम्यान त्याच्याजवळील एका प्लॅस्टीकच्या पोत्यामध्ये १७ हजार रुपयांच्या एकूण १७ लोखंडी तलवारी सापडल्या. या तलवारींबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने या तलवारी विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची कबुली आरोपी भगतसिंगने दिली.

राज्यातील सामाजिक वातावरण पाहून जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी पद्मा कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्ह्याच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्र बंदी आदेशाप्रमाणे शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका इत्यादी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास किंवा बाळगण्यास मनाईचे आदेश केले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, संशयित भगतसिंग शिख यास विटा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button