Sangli : अखेर ‘यशवंत’च्या साखर कामगारांना ११२ दिवसानंतर मिळाला न्याय; विट्यातील आंदोलन मागे | पुढारी

Sangli : अखेर 'यशवंत’च्या साखर कामगारांना ११२ दिवसानंतर मिळाला न्याय; विट्यातील आंदोलन मागे

विटा; पुढारी वृत्तसेवा : नागेवाडी (ता.खानापूर) च्या यशवंत साखर कारखान्याच्या कामगारांची थकीत रक्कम मिळावी, यासाठी ११२ दिवसांपासून सुरू असंलेले आंदोलन अखेर आज बुधवारी संपले. जिल्हा बॅँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा बँक आणि कामगारांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर बॅँकेकडून कारखाना प्रशासकाच्या नावे ५ कोटी १५ लाख रूपयाचा धनादेश मिळाल्यानंतर कामगारांनीही समाधान व्यक्त केले.

यशवंत साखर कारखान्याची जिल्हा बॅँकेने २०१२ साली लिलावाची विक्री केली. खासदार संजय पाटील यांच्या गणपती जिल्हा संघाने कारखाना विकत घेतल्यानंतर बॅँकेकडे कामगारांच्या थकीत पगाराची ८ कोटी २८ लाख ८६ हजार ७०१ रूपयांची रक्कम होती. ती रक्कम कामगारांना मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेने १ फेब्रुवारी पासून विट्यातील तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शेकाप,भाजप, काँग्रेस आणि शेतकरी सेना यांनी पाठिंबा दिला होता.तब्बल ११२ बारा दिवस हे आंदोलन चालले आज या आंदोलनाचा ११३ वा दिवस होता. या कालाव धीत बँक प्रशासन व कामगार संघटनांत अनेक बैठका झाल्या. परंतु, त्याबाबत तोडगा निघाला नाही. अखेर जिल्हा बँकेचे संचालक तानाजी राव पाटील यांनी यशस्वी मध्यस्ती करत आंदोलन संपविण्याबाबत जबाबदारी घेतली होती. आज बुधवारी दुपारी संचालक तानाजी राव पाटील, कामगार संघटनेचे भाऊसाहेब यादव, गोपाळ पाटील, आनंदराव नलवडे यांच्यासह आंदोलनस्थळी कामगारांची बैठक झाली. त्यावेळी पाटील यांनी बँकेने कामगारां च्या थकीत पगारापोटी ५ कोटी १५ लाख रूपये देण्याचे मान्य केले असून तसा नागेवाडी साखर कारखान्याच्या प्रशासकाच्या नावे जिल्हा बँकेकडून धनादेश घेऊन आलो असल्याचे सांगितले. यावर भाऊसाहेब यादव यांनी उर्वरित रक्कमेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी बँकेने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत १ कोटी ३७ लाख रूपये वर्ग केले आहेत, मात्र कामगारांच्या म्हणण्यानुसार हे पैसे यापूर्वीच कामगारांच्या खात्याकडून भविष्य निर्वाह निधी वर्ग झालेले आहेत असे सांगण्यात आले. त्यावर संचालक पाटील यांनी जर हे पैसे कारखान्याच्या कामगारांच्या नावे भविष्य निर्वाह निधी दोन वेळा वर्ग झाले असतील तर जिल्हा बँक आणि कामगार संघटना यांनी संयुक्तपणे भविष्य निर्वाह निधी विभागाकडे पाठपुरावा करावा आणि जर दोनदा पैसे भरले गेले असतील तर ते पैसे काढून घेऊन सर्व कामगारांना दिले जातील, असा पर्याय सांगितला. या पर्यायाला उपस्थित सर्व कामगारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या नंतर संचालक पाटील यांनी थकीत पगारापोटी बॅँकेने दिलेला ५ कोटी १५ लाख रूपयांचा धनादेश कामगारांकडे सुपुर्द केला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे भाऊसाहेब यादव यांनी जाहीर केले. यशवंत कारखान्याच्या कामगारांना तब्बल ११३ दिवसानंतर न्याय मिळाल्यानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले.

पुढारीचे विशेष आभार : पाटील

दरम्यान, नागेवाडी च्या यशवंत साखर कामगारांच्या आंदोलनाच्या लढ्याला सतत बातमी देऊन पुढारीने बळ दिले. तसेच जिल्हा बँक आणि कामगार संघटना यांच्यातला दुवा बनून कामगारांना थकीत देणी देण्यास भाग पाडले. याबद्दल सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात पुढारीच्या भूमिकेचे विशेष आभार मानले.

Back to top button