Sangli Bribe Case : विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर अँटी करप्शनच्या जाळ्यात! | पुढारी

Sangli Bribe Case : विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर अँटी करप्शनच्या जाळ्यात!

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर अँटी करप्शन अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. दोन लाखांची लाच स्विकारताना त्यांना रंगाहाथ पकडले आहे. केवळ तीन महिन्यापूर्वी दहा मार्च रोजी त्यांची विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी बदली झाली होती. (Sangli Bribe Case)

विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना लाच लचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानुसार या विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील यांनी आज मंगळवारी (दि. १६) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान तीन महिन्यापूर्वी १० मार्च रोजी विनायक औंधकर यांची विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. आल्यापासूनच त्यांनी शहरातील बांधकाम व्यवसायिकांना आर्थिक दृष्ट्या त्रास देणे सुरू केले असल्याच्या तक्रारी सुरू होत्या.

सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून खानापूर रस्त्यावरील विश्रामगृहावर विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांची लाच लुचपत विभागाच्या मार्फत कसून चौकशी सुरू आहे, यात अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.

 

Back to top button