जयंत पाटील यांना ‘ईडी’ची दुसर्‍यांदा नोटीस | पुढारी

जयंत पाटील यांना ‘ईडी’ची दुसर्‍यांदा नोटीस

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना सोमवारी ‘ईडी’ने दुसर्‍यांदा नोटीस बजावली आहे. या नोटिसीत त्यांना सोमवारी (दि. 22) ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी 12 मे रोजी त्यांना पहिली नोटीस बजावली होती.

आयएल अँड एफएलएस कंपनीच्या संदर्भात ही नोटीस बजावली आहे. आ. जयंत पाटील यांनी यापूर्वी या कंपनीशी आपला कोणताही संबंध नसून मी याच कंपनीकडून नव्हे, तर कोणत्याही कंपनीकडून कधी कर्ज घेतलेले नाही. माझी राजकीय कारकीर्द खुली किताब असून, मी कधीही मनी लाँडरिंग केलेले नाही, असा खुलासा करत ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले होते.

तसेच ‘ईडी’ कार्यालयात हजर राहण्यास काही दिवसांची मुदतही मागितली होती. जाहीर कार्यक्रमातही आ. जयंत पाटील यांनी आपण काही केलेले नाही. त्यामुळे ‘ईडी’च्या नोटिसीला घाबरण्याचे काही कारण नाही, असे सांगितले होते. तोपर्यंत सोमवारी पुन्हा त्यांना ‘ईडी’ कार्यालयाने नोटीस बजावून सोमवारी चौकशीस हजर राहण्यास सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आ. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याआधीदेखील आ. पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात केलेल्या वक्तव्यांचा हा परिपाठ असल्याचीही समर्थकांमध्ये चर्चा आहे. त्यानंतर काही दिवसांतच ‘ईडी’ची ही नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात या नोटिसीची चर्चा रंगली आहे.

Back to top button