सांगली : कडेगावात वीज दरवाढ व अन्य समस्यांबाबत शेतकऱ्यांचा एल्गार | पुढारी

सांगली : कडेगावात वीज दरवाढ व अन्य समस्यांबाबत शेतकऱ्यांचा एल्गार

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा वीज दरवाढ कमी करावी. शेतकर्‍यांना अखंड आठ तास वीज पुरवठा करावा. धोकादायक तारा, पोल, डी. पी दुरुस्ती करावीत, सतत होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवावा यासह आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी कडेगाव शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते डी.एस.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळ समिती व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हल्लाबोल मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले. दरम्यान यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी हलगी वाजवत तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्त केला.

विजेच्या समस्याबाबत व प्रलंबित मागण्यासाठी बुधवार ( दि 10 ) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चास सुरुवात केली. यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातून थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडकला. जोरदार घोषणाबाजी व हलगी वाजवत या मोर्चाने महावीतरणवर हल्लाबोल केला.

शेतीला व घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. पाणी असून ही वीजे अभावी पिके वाळून जात आहेत. तर जुलमी वीज दरवाढ कमी करावी. विज बिल अभावी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत.
शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे. मुळे लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुस्थितीत जोडव्यात. शेती करीता नवीन वीज जोडणी कोणताही भ्रष्टाचार न करता जोडावीत. यासह आदी मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली. अन्यथा 9 जुनला आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी दिला. यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळो विजय शिंदे, संतोष डांगे, विजय गायकवाड, दीपक न्यायणीत, शशिकांत रासकर, मनोजकुमार मिसळ, सिद्दिक पठाण, प्रकाश गायकवाड, वसंत इनामदार, मोहन जाधव,जयवंतराव पवार,सुभाष भोसले,जगदीश महाडिक,जीवन करकटे, दत्तात्रय भोसले, रघुनाथ गायकवाड, जगन्नाथ नायकवडी, नितीन शिंदे, अभिमन्यू वरुडे, विजय भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव :

महावितरण कार्यालयावर संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा आल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शशिकांत पाटील यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. विजेच्या समस्यासह अन्य मागण्यांबाबत विचारणा केली. यावेळी सदर मागण्याबाबत वरिष्ठांना कळवण्यात आले आहे. तालुक्यातील व शहरातील वीज समस्या सोडवल्या जातील असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button