सांगली : दीड किलो सोन्यावर डल्ला; पोलिसांच्या चौकशीचे आदेश

File Photo
File Photo

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : विटा पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी संगनमत करून दीड किलो सोन्यावर डल्ला मारल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर विट्याच्या पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले. सागर जगदाळे याने पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

कोलकत्ता येथील सोन्याच्या दुकानात कामाला असलेला सागर मंडले याला दोन किलो सोने सापडले होते. ते सोने घेऊन तो बनपुरीला आला होता. त्याने दोन किलो सोने त्याचा मित्र सागर जगदाळे याच्याकडे दिले. ही माहिती कोलकत्ता येथील सोने व्यापारी सूरज मुल्ला याला समजल्यानंतर त्याने विटा पोलिसांच्या मदतीने जगदाळे व मंडले यांच्या घरावर छापा टाकून दोन किलो सोने जप्त केले. परंतु, त्यातील 455 ग्रॅम सोने रेकॉर्डला दाखवून उर्वरित 1545 ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचे जगदाळे याने तक्रारीत म्हटले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. विट्याच्या पोलिस अधीक्षक पद्मा कदम यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणात जगदाळे याच्याकडून पुरावे घेऊन यामध्ये कोण कोण पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news