

सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या 500 हून अधिक दुकाने, गाळेधारक यांना फ्रंटमार्जिन (सामासिक अंतर) मधील अतिक्रमणे काढण्याची नोटीस बजावली आहे. अतिक्रमण काढून घेण्यास 30 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास विशेष मोहीम राबवून अतिक्रमण काढले जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग (शंभरफुटी रस्ता) हा शहरातील महत्त्वाचा व अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. कोल्हापूर रोड ते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे. तो अनेक वर्षे आहे. हातगाडे, वाहन दुरुस्ती रस्त्यावरच सुरू असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी हा नेहमीचाच प्रश्न आहे.
दरम्यान, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढले जाणार असल्याचे संकेत दिले होते. पावसाळी पाण्याच्या निचर्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून शंभर फुटी रोडवर भोबे गटारीच्या समोरील बाजूस आणखी एक मोठी गटार होणार आहे, यासाठी दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटवण्याची मोहिम राबवली जाणार आहे, असे उपायुक्त वैभव साबळे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील 500 हून अधिक दुकाने, दुकानगाळे व अतिक्रमित अन्य मालमत्तांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. रस्ता ते दुकान यामध्ये सामासिक अंतर ठेवलेले असणे आवश्यक आहे. मात्र यामध्ये अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण 30 दिवसात काढून घ्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान खासदार विशाल पाटील यांची शंभर फुटी रोडवरील दुकानदार, गाळेधारक, व्यावसायिकांनी भेट घेऊन ही कारवाई थांबवावी, अशी मागणी केली. उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी खासदार पाटील यांनी चर्चा केली. सरसकट कारवाई करु नये, गरीबांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. जागतिक बँकेच्या सहकार्यांने पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी होणार्या मोठ्या गटाराच्या बांधकामासाठी विरोध असणार नाही, अशी भूमिकाही पाटील यांनी घेतल्याचे समजते.