सांगली : सोन्याची झळाळी कायम | पुढारी

सांगली : सोन्याची झळाळी कायम

सांगली; अंजर अथणीकर : शेअर मार्केटमध्ये होणारी गुंतवणूक आणि अमेरिकेतील बँका डबघाईला आल्यामुळे सोन्याचा दर अस्थिर होत आहे. सांगलीमध्ये दोन ते तीन तासाला दर बदलत आहेत. वर्षभरात सोन्याचा दर दहा ग्रॅमला दहा हजार रुपयांनी वाढला आहे. हा एक विक्रम आहे. दुसर्‍या बाजूला काल सायंकाळी 60 हजार 600 रुपये असणारा दर मंगळवारी दुपारी 59 हजार 600 रुपये झाला होता. दरम्यान, गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी सांगलीची बाजारपेठ सज्ज झाली आहे.

कलाकुसरीच्या दागिन्याला प्रसिद्ध असण्याबरोबरच सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या सांगलीच्या बाजारपेठेला विश्वासार्हतेचा लौकिक आहे. यामुळे येथील कुलाकुसरीच्या दागिन्यांना संपूर्ण महाराष्ट्रबरोबरच उत्तर प्रदेश, उत्तर कर्नाटकमध्ये मागणी अधिक आहे. सांगलीमध्ये सुमारे आठशे बंगाली कारागीर काम करतात.

सर्वाधिक अस्थिर दर यावर्षी दिसून आला. गेल्या आठ दिवसांत सोन्याचा दर पाच हजार रुपयांनी वाढला आहे. वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास दहा हजार रुपये प्रतितोळा (दहा ग्रॅम) वाढ झाली आहे.

सोन्याप्रमाणे चांदीचे दरही अस्थिर झाले आहेत. गेल्या महिन्याभरात चांदीचा दर जवळपास पाच हजार रुपयांंनी वाढला आहे. मंगळवारी चांदीचा दर 69 हजार 500 रुपये प्रतिकिलो होता.

सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घटना परिणाम करीत असतात. भारतीय सणासुदीच्यावेळी खरेदीचा सोन्याचा दरावर काहीही परिणाम होत नाही. गुढीपाडव्याला सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. यामुळे आज पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीचा सराफी बाजार सोन्याची आभूषणे, अलंकार विक्रीसाठी सज्ज झाला आहे.

सोन्याच्या दरातील चढ-उतार हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घडामोडीवर ठरत असतात. सांगलीच्या बाजारपेठेतही तास, दोन तासांनी दर बदलत असतात. त्यामुळे आम्ही सर्वसाधारण सकाळचा दर स्थिर ठेवतो. खूपच फरक पडला तर तो सर्वांना सांगून बदलतो. जिल्ह्यामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसाधारणपणे 20 कोटींची उलाढाल होते.
– पंढरीनाथ माने, सचिव, सराफ असोसिएशन, सांगली जिल्हा

Back to top button