तासगाव : कालव्यात पाणी अन् नियोजन ‘पाण्यात’ | पुढारी

तासगाव : कालव्यात पाणी अन् नियोजन ‘पाण्यात’

तासगाव; दिलीप जाधव : दुष्काळी टापूतील तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. म्हैसाळपासून जतपर्यंत कालव्यातून पाणी वाहताना दिसत आहे. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत या चार तालुक्यांसाठी पाणी वाटपाचे नियोजन मात्र केलेले नाही. त्यामुळे म्हैसाळच्या पाण्याची अवस्था ‘कालव्यात पाणी आणि नियोजन पाण्यात’ अशी झाली आहे.

ऐन गरजेच्या वेळी केवळ कालव्यात पाणी बघायला मिळत आहे. प्रत्यक्षात पाणी शेतीसाठी मिळत नसल्याने, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाच्या ढिसाळ नियोजनाबाबत शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विभागाचे अधिकारी सामान्य जनतेला जुमानत नाहीत. लोकप्रतिनिधींनीच यामध्ये लक्ष देऊन शेतकर्‍यांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
कायमस्वरूपी दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मिरजेचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगाव, जत या चार तालुक्यातील शेतकर्‍यांना फेब्रुवारीनंतर म्हैसाळ योजनेच्या पाण्याची नितांत गरज असत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुढाकार घेऊन म्हैसाळ योजना सुरू केली, परंतु पाण्यासाठी मागणी अर्ज नसल्याने अधिकार्‍यांनी योजना बंद केली होती. शेतकर्‍यांची वाढती मागणी लक्षात घेऊन म्हैसाळ योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात आले.

सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत योजनेचे अंदाजे 52 पंप सुरू आहेत, परंतु पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन अधिकार्‍यांनी केलेले नाही. कालव्यातून पाणी वाहत आहे, परंतु पाणी उपसा परवानगी मात्र शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेली नाही.
योजना पूर्ण क्षमतेने चालवायला पाहिजे

या हंगामात म्हैसाळ योजना सुरू होऊन दीड महिना पूर्ण झाला. आतापर्यंत पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या टप्प्यातील 100 पंप सुरू होणे अपेक्षित होते. आजपर्यंतचा इतिहास तसाच आहे, परंत दीड महिन्यानंतरही म्हैसाळ योजनेचे केवळ 52 पंप सुरू आहेत. योजनेवर अवलंबून असणार्‍या 4 दुष्काळी तालुक्यातील कोणत्याही भागाची पाण्याची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे योजना पूर्ण क्षमतेने चालवायला पाहिजे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज

म्हैसाळ योजनेअंतर्गत येणार्‍या तालुक्यांच्या गावातील सर्व शेतकर्‍यांना योजनेच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी आवश्यक एवढे मनुष्यबळ आजमितीस तरी ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे गावोगावी जाऊन पाणी वाटप अर्ज भरून घेणे व्यवस्थापन विभागाला शक्य नाही. शेतकर्‍यांना हक्काचे असे म्हैसाळचे पाणी वेळेवर मिळायचे असेल तर ग्रामपंचायतींनी गावात पाणी मागणी अर्ज भरून घेणे, सर्वांची पाणीपट्टी गोळा करून विभागाच्या अधिकार्‍यांना देणे यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरच म्हैसाळच्या योजनेचे आवर्तन सुरळीतपणे चालू शकणार आहे.

Back to top button