सांगली : पिझोमीटरने भूजल पातळी मोजणी | पुढारी

सांगली : पिझोमीटरने भूजल पातळी मोजणी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील 95 गावांमध्ये पिझोमीटर आणि पर्जन्यमापक बसविण्यात येणार आहे. यामुळे या गावात पाण्याचा किती उपसा झाला, भूजल पातळी किती आहे, हे ग्रामस्थांना कळणार आहे.

केंद्र सरकार जागतिक बँकेच्या मदतीने अटल भूजल योजना 2025 पर्यंत राबविणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील 95 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दर तीन महिन्याला भूजल संरक्षण विभागाला भूजल पातळी मोजावी लागते. त्यासाठी काही विहिरींची निवड करून संबंधित अधिकारी व कर्मचारी भूजल पातळी मोजतात. यासाठी जास्त कालावधी लागतो.

शिवाय तीन महिन्याला भूजल पातळी समजते. यावर उपाय म्हणून अटल भूजल योजनेतून पिझोमीटर यंत्राद्वारे दररोज त्या गावातील भूगर्भात किती पाणी आहे आणि त्याचा किती उपसा झाला, याची माहिती मिळणार आहे.

हे पिझोमीटर म्हणजे एक विंधन विहीर आहे. त्यावरती स्वयंचलित मशीन बसवून पाण्याची पातळी मोजण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायती अंतर्गत पिझोमीटरची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी 94 विंधन विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले आहे. विंधन विहिरीं भोवती जाळी लावण्याचे काम सुरू आहे.

या तालुक्यात बसणार पिझोमीटर

कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, जत, मिरज तालुक्यातील गावांमध्ये पिझोमीटर बसविण्यात येणार असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button