सांगली : डोंगरांना आगी लावण्यामुळे वनसंपदा धोक्यात | पुढारी

सांगली : डोंगरांना आगी लावण्यामुळे वनसंपदा धोक्यात

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या वणव्यांमुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, मरळनाथपूर डोंगररांगेतील वनसंपदा धोक्यात सापडली आहे. या परिसरातील जंगलात नुकताच दुपारच्या रखरखत्या उन्हात वणव्याचा भडका उडाला होता. त्यामध्ये मोठमोठ्या वृक्षावरील पशू-पक्षी सैरभैर झाले.

ऐतवडे बुद्रुक ते मरळनाथपूर, रेठरेधरण मुख्य रस्त्यालगत मोठा जंगलपट्टा आहे. परंतु या जंगलास दरवर्षी उन्हाळ्यात कुठे ना कुठे आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. मार्च, एप्रिल, मे महिन्यात अनेक शेतकरी शेतातील बांध पेटवून देतात. त्यामुळे ही आग वार्‍याने जंगलापर्यंत पोहोचते. हा वणवा वनसंपत्तीची मोठी हानी करत आहे. आग विझविण्यासाठी माजी ग्रा. पं. सदस्य प्रशांत कुंभार यांच्यासह ढगेवाडी, रेठरेधरण, ऐतवडे बुद्रुक, मरळनाथपूर गावांतील ग्रामस्थांसह वनविभागाच्या अधिकार्‍यांनी श्रम घेतले.

वृक्षसंवर्धनावरही घाव

सातत्याने लागणार्‍या वनव्यामुळे वृक्षाचे प्रमाण हे कमी झाले आहे. त्यात अवैध वृक्षतोडीचे प्रकारही वाढलेले आहेत. जंगलात आग लागल्यानंतर आठ दिवसांनी त्या ठिकाणचे वृक्षसुद्धा गायब झाल्याचे बघायला मिळते, असे वृक्षप्रेमींमधून बोलले जाते. वणव्यामुळे जंगलातील प्राण्यांची धावाधाव होते.

Back to top button