सागंली : शिवणीत २८, रेठरेधरण तलावात ७ टक्के पाणीसाठा | पुढारी

सागंली : शिवणीत २८, रेठरेधरण तलावात ७ टक्के पाणीसाठा

शिराळा; विठ्ठल नलवडे : शिराळा तालुक्यात शिवणी व रेठरेधरण तलावातील उपयुक्त पाणीसाठा कमी झाला आहे. पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कडक उन्हाळ्यामुळे विहिरी व कुपनलिका पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. रेठरेधरण तलावात 7 टक्के, तर शिवणी धरणात 28 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. इंग्रुळ पाझर तलाव कोरडा पडला आहे.

तालुक्यातील 49 पाझर तलावातील पाणीसाठा 50 टक्के कमी झाला आहे. तालुक्यात 472 कुपनलिका आहेत. त्यातील 450 सुरू आहेत. कुपनलिकांची पाण्याची पातळी खालावली आहे. 22 कुपनलिकांची दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीने सुरू केली आहेत. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे भाजीपाला, ऊस पिके धोक्यात आली आहेत.

वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी करमजाई धरणात आल्यामुळे मोरणा नदीच्याकाठच्या शेतीला थोडा दिलासा मिळाला आहे. शिराळा तालुक्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. सर्वच धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. करमजाई धरणात वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी येते. त्यामुळे पाणीसाठा त्या ठिकाणी वाढला आहे. रेठरेधरणातील पाण्यावर 6 हेक्टर रब्बी हंगामातील पिके आहेत. करमजाई धरणाच्या पाण्यावर 49 हेक्टर ऊस, 18 हेक्टर रब्बी हंगामातील पिके आहेत.

धरणात 82 टक्के पाणीसाठा झाला आहे. करमजाई धरणातील पाणी मोरणा धरणातून मोरणा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. मोरणा धरणात 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडण्यात येते, तर आठ दिवस बंद असते. मोरणा धरणात पाण्यावर 495 हेक्टर ऊस तर 438 हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्र भिजते.

Back to top button