सांगली : फसवणुकीतील 13 लाख गोठविले | पुढारी

सांगली : फसवणुकीतील 13 लाख गोठविले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील डॉ. सोनिका मियापूरम यांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार सायबर क्राईम विभागाने हाणून पाडला. डॉ. मियापूरम यांची फसवणूक करणार्‍या संशयिताच्या बँक खात्यातील 13 लाख रुपयांची रक्कम गोठविली.

संशयिताने डॉ. मियापूरम यांना संपर्क साधून मुंबईतील सायबर क्राईम विभागातून बोलत आहे. ‘तुमचे एफईडेक्स विभागातून पार्सल आले आहे. ते कस्टम ऑफीसने जप्त केले आहे. तुम्हाला 98 हजार 326 रुपये दंड भरावा लागेल’, असे सांगितले. त्यामुळे डॉ. मियापूरम यांनी घाबरून ऑनलाईन दंडाची रक्कम पाठविली. मात्र त्यांना शंका आल्याने त्यांनी सांगलीच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली.
सायबर विभागाने तांत्रिक तपास केला. डॉ. मियापूरम यांनी दंडाची पाठविलेली रक्कम एका बँकेत संबंधित संशयिताच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. सायबर विभागाने तातडीने बँकेशी संपर्क साधला. संशयिताच्या खात्यात 13 लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती मिळाली. सायबरने ही सर्व रक्कम गोठविली आहे. संशयिताचे नाव निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. याचा तपास करण्यासाठी सायबरचे पथक मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button