सांगलीत व्यापार्‍याला साडेतीन लाखांचा गंडा | पुढारी

सांगलीत व्यापार्‍याला साडेतीन लाखांचा गंडा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील पत्रकारनगरमधील सिद्धार्थ अ‍ॅटो इंजिनिअर्स प्रा. लि. च्या मालकास कामगारानेच तीन लाख 41 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी प्रफुल्ल ज्ञानेश्वर गावंडे (रा.भांडेगाव, जि. यवतमाळ) या कामगाराविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित गावंडे हा सिद्धार्थ अ‍ॅटो इंजिनिअर्समध्ये स्टोअरप्रमुख म्हणून काम करीत होता. दोन महिन्यापूर्वी त्याने जेसीबीच्या विविध प्रकारच्या स्पेअरपार्टची कवठेमहांकाळ येथे विक्री केली. यामधून तीन लाख 41 हजार रुपये आले होते. ही रक्कम त्याने स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली. मालकाला त्याने काहीच सांगितले नाही.

जेसीबीचे साहित्य स्टोअरमध्ये कमी झाल्याचे व्यवस्थापक महेश रावसाहेब आडमुठे (वय 49, रा. मंगळवार पेठ, मिरज) यांच्या लक्षात आले. त्यांनी गावंडे याच्याकडे विचारणा केली. त्याने स्पेअरपार्ट विक्री केल्याची कबुली दिली. आडमुठे यांनी त्याला पैसे जमा करण्यास सांगितले.

मात्र तो टाळाटाळ करू लागला. गेल्या चार दिवसांपासून तो कामावर गेला नाही. तसेच त्याचा मोबाईलही बंद लागत आहे. त्यामुळे आडमुठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Back to top button