सांगली : ऊस उत्पादनात एकरी 20 टनांची घट | पुढारी

सांगली : ऊस उत्पादनात एकरी 20 टनांची घट

पलूस; पुढारी वृत्तसेवा : कृष्णाकाठी शेतीवर 2019 पासून नैसर्गिक संकटांची मालिका सुरू आहे. गतवर्षी अवेळी पडलेल्या पावसाचा मोठा फटका सोयाबीन नंतर आता ऊस उत्पादनाला बसल्याचे चित्र समोर आले आहे. भागात ऊस उत्पादनात एकरी 20 टनांची घट आली आहे.

बेसुमार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पांढरी मुळी न सुटू शकल्यामुळे उसाची वाढ, जाडी खुंटल्यामुळे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर, स्थानिक वाहतूकदारांना उचल घेऊन टोळ्यांनी दांडी दिल्याने यंत्रणे अभावी ऊस वेळेवर न जाणे, जळून जाणे, काटामारी अशा कारणांमुळे हा फटका बसला आहे.

या हंगामात ऊस लागण पिकाचे उत्पादन एकरी सरासरी 45 टनापर्यंत घसरले आहे. खोडवा, नेडवा सरासरी एकरी ऊस उत्पादन 15 ते 25 टनांपर्यंत खाली आले. परिणामी ऊस तोडणीचा खर्च आणि पीककर्ज फेडून शेतकर्‍याच्या हातात फारसे काही उरणार नसल्याचे चित्र आहे.

नदीकाठावरील धनगाव, आमणापूर, बुर्ली, दुधोंडी, अंकलखोप, भिलवडी, ब्रह्मनाळ या भागात सरासरी उत्पादनामध्ये एकरी तब्बल 20 ते 25 टनापर्यंत घट झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

खतांच्या महागड्या किमती, वीज बिल, तेलाचे, मेहनतीचे, मजुरीचे वाढते दर यातून शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. राज्याच्या अर्थकारणात सर्वात मोठी भर घालणार्‍या ऊस शेतीच्या विदारक अवस्थेची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन ऊस उत्पादकांना मदतीचा हात देण्याची मागणी होऊ लागली आहे.

Back to top button