सांगली : उन्हामुळे पालेभाज्यांचे दर लागले वाढू | पुढारी

सांगली : उन्हामुळे पालेभाज्यांचे दर लागले वाढू

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका चांगलाच जाणवत आहे. त्यात ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे.

येथे सांगली जिल्ह्यासह, कोल्हापूर जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठी आवक होते. ऑक्टोबरपासून येथे भाजीपाल्याची आवक चांगली होती. त्यामुळे दर कमीच होते. पालक, मेथी, कोथिंबीर, करडई, तांदळी या भाज्या 5 ते 10 रुपयास होत्या. आठवडाभरात मात्र दर कमीत कमी 10 ते 15 रुपये राहिले आहेत.

दरम्यान, कोबी, फ्लॉवर वीस ते तीस रुपयांस आहे. वांग्याची आवक जास्त असल्याने दर 30 ते 40 रु. किलो आहे. दोडका, कारले 40 रु. किलो., टोमॅटो14 ते 20 रु. किलो आहेत. बटाटा 25 ते 30 रु. तर कांदे 20 रुपये किलो आहे. दुधी भोपळा प्रतिनग दहा रुपये आहे. ओला वाटाणा प्रतिकिलो 40 ते 60 रु., घेवडा, भेंडी 60 ते 80 रु., गवारी 80 ते 10 रु. किलो आहे. गाजर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये आहे. मक्याचे कणीस प्रति नग दहा ते पंधरा रु. आहे. आवक देखील वाढली आहे.

काकडी, लिंबू, कलिंगडला मागणी

वाढत्या उन्हामुळे लिंबू, काकडी, कलिंगडला मागणी वाढत आहे. त्यामुळे दर आता वाढू लागले आहेत. काकडी 60 ते 80 रु. किलो आहे. लिंबू दहा रुपयास दोन ते तीन आहेत. कलिंगड प्रति नग 10 ते 40 रुपये आहे.

Back to top button