सांगली : दोन आंतरराज्य घरफोड्यांना अटक; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सांगली : दोन आंतरराज्य घरफोड्यांना अटक; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

सांगली : पुढारी वृत्तसेवा : सांगली – कोल्हापूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. मिरजेतील सुभाषनगर येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील पाच लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक केलेल्यांमध्ये अक्षय लक्ष्मण कांबळे (वय २७, रा. हुळ्ळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज) व महंम्मदहुसेन उर्फ हनीसिंगउर्फ मच्छर महंम्मदगौस शेख (२६, रामनगर, धारवाड, राज्य कर्नाटक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून सांगली, विश्रामबाग, कुपवाड, बामणी, कोरोची व हातकणंगले येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक मिरज भागात गस्त घालत होते. त्यावेळी अक्षय कांबळे व महंम्मद हुसेन शेख हे दोघे घरफोडी करून मिळविलेले दागिने विक्री करण्यासाठी सुभाषनगर येथे आप्पासाहेब हुळे प्लॉटच्या कमानीजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तिथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर एका पिशवीत पाच लाख ३७ हजार रुपयांचे दागिने सापडले. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे दागिने घरफोड्या करून लंपास केल्याची कबुली दिली. दोघांना पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हवालदार दीपक गायकवाड, ऋतुराज होळकर, प्रशांत माळी, संदीप नलवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेखविरूद्ध कर्नाटकात नऊ गुन्हे दाखल

महंम्मद हुसेन शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध धारवाडमधील विद्यानगर पोलिस ठाण्यात पाच घरफोडी, सबरबन पोलिस ठाण्यात दोन व हवेरी पोलिस ठाण्यात एक असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. सांगली पोलिसांच्या रेकॉर्डवर तो पहिल्यांदाच आला आहे.

Back to top button