वळसंग सरपंच-उपसरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव सलग दुसऱ्यांदा फेटाळला | पुढारी

वळसंग सरपंच-उपसरपंच विरुद्धचा अविश्वास ठराव सलग दुसऱ्यांदा फेटाळला

जत; पुढारी वृत्तसेवा : वळसंग (ता. जत) येथील सरपंच पूजा रमेश माळी व उपसरपंच श्रीमती वंदना प्रकाश निळे यांच्यावरील अविश्वास ठराव सलग दुसऱ्यांदा फेटाळला आहे. ॲड पुजारी व चव्हाण या गटांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. गुरुवारी अविश्वास ठरावासाठी सर्व सदस्यांची सभा तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. या सभेस अविश्वासाच्या बाजूने केवळ तीनच सदस्य हजर झाले होते. विद्यमान सरपंच व उपसरपंच यांनी या ठरावाला विरोध दर्शवल्याने व अविश्वास ठराव साठी ३/४ सदस्यांचे बहुमत सिद्ध न झाल्याने अविश्वास ठराव तहसीलदार बनसोडे यांनी फेटाळला आहे.

अविश्वास ठराव सलग दुसऱ्यांदा बारगळल्याची नामुष्की ॲड. म्हाळाप्पा पुजारी व मनीष चव्हाण गटाला पत्करावी लागली आहे. अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर सरपंच माळी व उपसरपंच निळे समर्थकांनी गावातून जेसीबीने गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. अविश्वास ठराव यशस्वी होऊ नये म्हणून युवक कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. तसेच याकामी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे.

यापूर्वी पुजारी व चव्हाण गटांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली केल्या होत्या. याबाबतचे पत्र तहसीलदार बनसोडे यांना देण्यात आले होते. परंतु सरपंच निवड झाल्यापासून किमान दोन वर्षापर्यंत अविश्वास ठराव दाखल करता येत नाही या कारणावरून विना कार्यवाही अविश्वास ठराव स्थगित करण्यात आला होता. तदनंतर ही चव्हाण गटाने कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव आणायचा असा चंग बांधला होता. ९ मार्च २०२३ रोजी सात सदस्यांचे अविश्वास ठराव दाखल करावा. याबाबतचे पत्र तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे सादर केले होते. यानुसार तहसीलदार यांनी गुरुवारी सर्व सदस्यांची सभा आयोजित केली होती.या सभेस पाच सदस्य उपस्थित होते. यातील अविश्वास ठराव दाखल व्हावा म्हणून केवळ तीन सदस्यांनी मत मांडले. सरपंच उपसरपंच यांनी ठराव नामंजूर व्हावा म्हणून मत व्यक्त केले. तहसीलदार जीवन बनसोडे यांनी महिला पदासाठी सदरचे पद आरक्षित असल्याने या सरपंच पदाकरिता अविश्वास आणण्यासाठी किमान २/३ कशाची आवश्यकता असते.

Back to top button