सांगली : जीवनवाहिनी कृष्णामाई ठरतेय जीवघेणी | पुढारी

सांगली : जीवनवाहिनी कृष्णामाई ठरतेय जीवघेणी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदीत शुक्रवारी रसायनयुक्त पाण्यामुळे लाखो मासे तडफडून मेले. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. हेच प्रदूषित पाणी पिण्यासाठीही वापरात, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या प्रदूषणाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे दुर्लक्ष आहे.

आरोग्याला धोकादायक ठरणारे पाणी नदीत थेट सोडणारे बड्या राजकीय नेत्यांचे कारखाने, महापालिका नगरपालिका यांच्यावर ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे हा मनमानी कारभार सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी दंडात्मक कारवाई तर कधी नोटीस बजावते. त्यावर पालिका प्रशासनाने सांडपाण्याची उपाययोजना करण्यासाठी केवळ कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग केल्याचे कित्येकदा समोर आले आहे.

प्रदूषण केवळ राजकीय मुद्दा

कृष्णेच्या प्रदूषणाबाबत राजकीय पक्षांनी, नेत्यांनी राजकीयदृष्टीने पाहिले. अगदी नगरसेवक पदापासून खासदार, आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत नदी प्रदूषणाचा मुद्दा गाजतो. मात्र, शुद्ध व स्वच्छ पाणी देणे ही मूलभूत सुविधाही अद्याप पुरी करता आली नाही.
शेरीनाला हा केंद्रबिंदू

शहरातील सांडपाणी मिसळणारा शेरीनाला हा कृष्णेच्या प्रदूषणाचा केंद्रबिंदू आहे. अनेक आंदोलनानंतर शेरीनाला येथे सांडपाणी शुध्द करून शेतीसाठी हे पाणी देण्याच्यादृष्टीने धुळगाव योजना अस्तित्वात आली. पण 27 कोटीची योजना आज 70 कोटी खर्च होऊनसुद्धा पूर्णक्षमतेने सुरू होऊ शकली नाही.

प्रदूषित पाण्यामुळे वाढते आजार

सांगलीसह नदीकाठावरील गावे यांचे सांडपाणी नदीत थेट सोडले जाते. त्याशिवाय साखर कारखाने, दूध संस्था शहरातून पुढे जाणारी कृष्णा नदी आणखी मोठ्या प्रमाणात दूषित होते आणि पुढील शहरांना, गावांना प्रचंड दूषित पाणी प्यावे लागते, पण त्याबाबत कोणालाच काळजी नाही. पालिकेकडून खरंतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प निर्माण करणे गरजेचे आहे, पण ते होताना दिसत नसल्याचे मतही सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी व्यक्त केले.

मनपाला दररोज दोन लाखांचा दंड

सांगली शहर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया करून शुद्ध न करता थेट कृष्णा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे महापालिकेस न्यायालयाने दररोज दोन लाख रुपयांचा दंड केला आहे. हा दंड महापालिकेचे स्वतंत्र बँक खाते तयार करून त्यावर भरण्यात येत आहे. ही रक्कम लाखो रुपये झाली आहे.

‘राजारामबापू, हुतात्मा’ची बँक हमी जप्त

जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा या साखर कारखान्याने नदीत प्रदूषित पाणी सोडल्याप्रकरणी त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. ‘राजारामबापू’ची 15 लाख रुपयांची तर ‘हुतात्मा’ची 7 लाखांची बँक हमी जप्त केली आहे.

शेतकरी संघटनेची पुन्हा न्यायालयात धाव

सुनील फराटे यांनी राजारामबापू, हुतात्मा यासह जिल्ह्यातील दहा कारखाने, सांगली महापालिका, आष्टा व इस्लामपूर नगरपालिका यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. हरित न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हवामान विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सांगली जिल्हाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, स्वप्नपूती साखर कारखाना यांच्या विरोधात दावा दाखलसाठी नोटीस काढली आहे.

नदीतील रसायनयुक्त पाणी थेट पिणे धोकादायक आहे. त्यामुळे उकळून थंड केलेले पाणी प्यावे. त्वचेचे रोग टाळण्यासाठी नदीपात्रात जाणे टाळावे. या दिवसात स्वच्छ व शुद्ध पाणी भरपूर प्यावे. तापासारख्या आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. अजय मेहता, अध्यक्ष, आयएमए, सांगली

प्रदूषण करणार्‍या बड्यांवर ठोस कारवाई होणार तरी कधी?

शहराचे सांडपाणी करतेय कृष्णेला प्रदूषित

नदीचे सर्वाधिक प्रदूषण हे महापालिका क्षेत्रात होते. शहरात दररोज जवळपास 80 एमएलडी इतके सांडपाणी निर्माण होते. यापैकी जवळपास 40 एमएलडी सांडपाणी हे थेट नदी पात्रात मिसळते. पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने हे सर्व होत आहे. महापालिकेने सांडपाणी शुद्धीकरणासाठी 3 योजना तयार केल्या, पण यातील केवळ 1 योजना अस्तित्वात आली आहे. धुळगाव या योजनेच्या माध्यमातून सांगलीतील जवळपास 40 एमएलडी सांडपाणी प्रकियेद्वारे शेतीला देण्यात येत आहे. उर्वरित सांडपाणी हे नदी पात्रात मिसळते. पण तेही शुद्धीकरण करण्यासाठी योजना तयार आहे. त्याचे काम सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. लवकरच पालिकेच्या आणखी दोन योजना कार्यान्वित होतील आणि नदी पात्रात मिसळणारे प्रदूषित पाणी जवळपास बंद होईल.

टास्क फोर्सची स्थापना आणि कृती आराखडा तयार

राज्यातील नदी प्रदूषणाबाबतीत राष्ट्रीय हरित लवाद आणि शासनाकडून नदी प्रदूषित कृती आराखडा तयार करण्यासाठी नदी पुनोरोधान समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पर्यावरण सनियंत्रण दल स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सांगली विभागाकडून नदीच्या प्रदूषण बाबतीत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तो शासनाला सादरही केला आहे. लवकरच कृती आराखड्यानुसार गावपातळीपासून शहरापर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपायोजना करण्यात येणार असल्याचे औताडे यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button