सांगलीत खंडणी मागणार्‍या दोघांना अटक | पुढारी

सांगलीत खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : विश्रामबाग येथील हॉटेल साई प्रार्थनाच्या चालकाला कुकरीचा धाक दाखवत त्याच्याकडे दर महिन्याला पन्नास हजारांची खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल चालक देवीप्रसाद शेट्टी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

दरम्यान, याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली. अनिरुद्ध संजय माने (वय 22, रा. सिद्धार्थनगर, कुपवाड), अर्जुन चंद्रकांत म्हारगुडे (वय 24, रा. रविवार पेठ, माधवनगर) अशी संशयितांची नावे आहेत. अनोळखी दोघे फरार आहेत.

पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी रात्री उशिरा चार संशयित हॉटेल साई प्रार्थना येथे आले. दारू पिऊन झाल्यानंतर चौघेही कॅश काऊंटरवर आले. तेथे त्यांनी आम्ही पैसे देणार नाही. तुमची सेवा खराब आहे. आम्ही कोण आहे तुम्हाला माहीत नाही. मी कुपवाडचा दादा आहे. तुम्हाला मस्ती आली आहे का, दर महिन्याला पन्नास हजारांची खंडणी द्या तसेच दारू, जेवण फुकट द्या नाहीतर तुम्हाला धंदा करून देणार नाही. तुम्ही कसे जिवंत राहता तेच बघतो, असे म्हणून एकाने त्याच्याजवळील कुकरी काढून हॉटेलचा व्यवस्थापक सागर कोरे याला धमकावले.

याची माहिती मिळाल्यानंतर शेट्टी हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी एकजण हातात कुकरी घेऊन हॉटेलमधील सर्वानाच धमकावत होता. नंतर त्याला पकडून त्याच्याकडील कुकरी काढून घेतली. त्यावेळी त्यांचे दोन साथीदार पळून गेले. त्यानंतर माने आणि म्हारगुडे यांना पकडून ठेवले. त्यानंतर शेट्टी यांनी याची माहिती विश्रामबागचे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.

Back to top button