

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : कराड-विटा या राष्ट्रीय महामार्गाववरील येवलेवाडी हद्दीत चार चाकी मारुती कारने भरधाव वेगाने रस्त्याकडेला बसलेला द्राक्ष विक्रेत्या महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. शुभांगी विक्रम जाधव( वय ३५ रा येवलेवाडी) असे द्राक्ष विक्रेत्या मयत महिलेचे नाव आहे. तर शुभांगी यांचे पती विक्रम कुंडलिक जाधव (वय ३७) ,शरद महादेव जाधव (वय ४१), मुकुंद हणमंत शेवाळे (वय ३० सर्व रा. येवलेवाडी) असे जखमींची नावे आहेत.दरम्यान याप्रकरणी संशयित आरोपी कार चालक राजेंद्र उर्फ संभाजी रामचंद्र घार्गे (वय ५९ रा उपाळे मायणी ता कडेगाव) याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अजित भिकू जाधव ( वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना बुधवार ( दि. ८) रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली.दरम्यान या घटनेने येवलेवाडीसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटना स्थळावरून व चिंचणी वांगी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुभांगी जाधव व विक्रम जाधव हे पती पत्नी येवलेवाडी येथील रहिवाशी असून शेती व रस्त्यालगत बसून द्राक्ष ,वडापाव व्यवसाय व रोजगार करतात.दरम्यान नेहमी प्रमाणे शुभांगी व त्यांचे पती विक्रम हे कराड-विटा या राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याकडेला झाडाखाली बसून द्राक्षे विक्री करीत होते.यावेळी द्राक्षे खरेदी करण्यासाठी शरद महादेव जाधव हे त्यांच्या जवळ उभे राहिले होते.या दरम्यान कडेगाव हुन विटा रस्त्याला संशयित चालक आरोपी संभाजी रामचंद्र घार्गे हे आपली चार चाकी ( वाहन क्र एम एच १० सी एन ६९४१) निघाले होते.
दरम्यान कार येवलेवाडी हद्दीत भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत रस्त्याकडेला द्राक्ष विक्री करीत असलेल्या शुभांगी व विक्रम जाधव यांना धडक दिली.या धडकेत शुभांगी यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती विक्रम व द्राक्ष खरेदी करण्यासाठी आलेले शरद जाधव हे गंभीर जखमी झाले.तर वाहनाची गती अधिक असल्याने पुढे हे वाहन रस्त्यावर चाललेल्या दोन चाकीमोटार सायकल( क्र एम एच १० डी एक्स ९३५९ ) वाहनस्वार मुकुंद हणमंत शेवाळे यांनाही धडक दिली.त्यामध्ये मुकुंद देखील गंभीर जखमी झाले. जखमींवर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.
शुभांगी जाधव या शेतकरी गोरगरीब कुटुंबातील महिला रोज रस्त्याकडेला द्राक्षे, वडापाव विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होत्या.आज सकाळी शुभांगी या गावातील महिला दिनानिमित्तच्या बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रम नंतर त्यांनी सर्व महिलांसोबत आपले ग्रुप फोटोसेशन केले होते.मात्र हा महिला दिनाचा कार्यक्रम त्यांचा शेवटचा ठरला.