विट्याचा पुढील आमदार ठाकरे गटाचाच : संजय राऊत

विटा : पुढारी वृत्तसेवा : “आम्ही जिथं जातो, तिथं बाबरी पडतेच! आपण वीट नाहीतर दगड तर मारूच. विट्याचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल, अशा भाषेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडले.
खा. राऊत हे सांगलीहून कराडकडे जाताना विटामार्गे गेले. यावेळी विट्यात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विटा – येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून राऊत यांनी जनतेशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव पाटील, शहराध्यक्ष अविनाश चोथे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, शिवाजी शिंदे, तालुकाप्रमुख राज लोखंडे, अॅड. संदीप मुळीक, शंकर मोहिते, संग्राम माने, अॅड. सचिन जाधव, अॅड. विजय जाधव, प्रताप सुतार, विनोद पाटील, सुभाष भिंगारदेवे, रवी कदम उपस्थित होते. राऊत म्हणाले, मी इथं येणार आहे असं समजल्यावर म्हणे स्पिकरला परवानगी दिली नाही.गावागावातले पाणी बंद केले आहे.
सगळीकडे दहशत चालू आहे. इथले आमदार तर अपात्र ठरणारच आहेत. सर्वोच्च न्यायालय त्यांना घरी बसवणारच आहे. नाहीतर जनता घरी बसवणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर विट्यातली जनता विसरणार नाही. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. बाळासाहेब ठाकरे वरून पाहतायत. ज्यांनी आपल्याला अभिमान शिकवला, अस्मिता दिली. त्यांच्याशी बेईमानी करणारा कोणीही असो त्याला सोडायचे नाही. निवडणुका लागल्यावर विट्याचा पुढचा आमदार शिवसेनेचाच होणार, असेही खा. राऊत यांनी सांगितले.
यावेळी महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना यांच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.