सांगली : बेकरीत चोरी करणाऱ्या दोन कामगारांना उत्तर प्रदेशमधून अटक

पलूस : पुढारी वृत्तसेवा : येथील बालाजी बेकरी आणि स्वीट शॉपमधून चोरी करणाऱ्या दोन कामगारांना उत्तरप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश मधील प्रेमपाल कुमारपाल (वय ३४, रा. मूळगाव किसनदासपुरा, थाना- मटसैना, जिल्हा-फिरोजाबाद ) व निरंजन गंगाराम कुशवाह (वय ३३, रा. नागलाताल थाना बमरौली कटारा, जि. आग्रा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत बाबू कृष्णा बारा (वय ५०, रा. पलूस) यांनी फिर्याद दिली होती.
दोन संशयित औबारा यांच्या बालाजी बेकरी आणि स्वीट शॉप येथे कामगार म्हणून काम करीत होते. दोघांनी जानेवारी २०२२ ते १० जानेवारी २०२३ पर्यंत फिर्यादी आजारी असल्याचा गैरफायदा घेत वेळोवेळी गल्ल्यातून पैसे चोरी केले. चोरी केलेले पैसे बेकरीच्या शेजारी असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखा – पलूस येथून कामगार प्रेमपाल याच्या बँक ऑफ बडोदा शाखा फिरोजाबाद या शाखेत ट्रान्सफर केले होते.
वर्षभर वेळोवेळी लाखो रुपये गल्ल्यातून चोरी केलेले पैसे बँकेत ट्रान्सफर केले होते. चोरीचा प्रकार लक्षात येताच औंबारा यांनी ७ फेब्रुवारीरोजी वरील दोघांवर गुन्हा दाखल केला. पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी एक पथक तयार करून उत्तरप्रदेश आग्रा, फिरोजाबाद येथे पाठविले. मोबाईल लोकेशनवरून वरील दोघांना ताब्यात घेतले.
दि. ३ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. अंगझडतीमध्ये प्रेमपाल कुमारपाल कडून ४५ हजार, तर निरंजन कुशवाह याच्याकडे २१ हजार असा एकूण ६६ हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.